ॲपल हॉटेल’समोर तरुणावर कोयत्याने प्राणघातक हल्ला

 
धाराशिव: शहरातील ॲपल हॉटेल समोर किरकोळ कारणावरून एका २६ वर्षीय तरुणाला विनाकारण अश्लील शिवीगाळ करत धारदार कोयत्याने आणि लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मुजोर आरोपीने एवढ्यावरच न थांबता फिर्यादीच्या मोटरसायकलवर मोठा दगड मारून वाहनाचेही मोठे नुकसान केले आहे. या हिंसक हल्ल्यात तरुण गंभीर जखमी झाला असून, आनंदनगर पोलीस ठाण्यात संशयित आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सर्फराज शेख (रा. शालीमार कॉलनी, ता. जि. धाराशिव) असे गुन्हा दाखल झालेल्या संशयित हल्लेखोराचे नाव आहे. या प्राणघातक हल्ल्यात आझाद पाशुमियाँ शेख (वय २६, रा. एम.आय.डी.सी. परिसर, शासकीय रेस्ट हाऊस जवळ, धाराशिव) हा तरुण गंभीर जखमी झाला असून, त्याने आनंदनगर पोलिसांत रीतसर तक्रार दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आझाद शेख हे शनिवार, दि. ३० मे रोजी दुपारी पाच वाजेच्या सुमारास काही कामानिमित्त शहरातील ‘ॲपल हॉटेल’ परिसरात आले होते. यावेळी तिथे दबा धरून बसलेल्या आरोपी सर्फराज शेख याने आझाद यांना विनाकारण अडवले. काही समजण्याच्या आत आरोपीने आझाद यांना अत्यंत अश्लील आणि हिणकस भाषेत शिवीगाळ करण्यास सुरुवात केली.

आझाद यांनी या शिवीगाळीला विरोध केला असता, आरोपीने स्वतःच्या जवळील धारदार कोयता काढून आझाद यांच्यावर सपासप वार केले. कोयत्याचा गंभीर मार लागल्यामुळे आणि आरोपीने लाथाबुक्क्यांनी केलेल्या बेदम मारहाणीमुळे आझाद रक्तबंबाळ होऊन खाली कोसळले.
आझाद हे जखमी अवस्थेत असतानाच, आरोपीने त्यांच्या रस्त्याकडेला उभ्या असलेल्या मोटरसायकलवर जोरात मोठा दगड मारला. या दगडफेकीत दुचाकीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. भररस्त्यात कोयता आणि दगडफेकीचा हा थरार सुरू असताना परिसरातील नागरिकांमध्ये मोठी भीती पसरली होती. आरडाओरडा झाल्यानंतर नागरिक मदतीसाठी धावून आले, तेव्हा आरोपी सर्फराज शेख तिथून पसार झाला. जखमी आझाद यांना तात्काळ उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले.


रुग्णालयात उपचार घेतल्यानंतर पीडित तरुण आझाद शेख याने बुधवार, दि. ३ जून रोजी आनंदनगर पोलीस ठाणे गाठून फिर्याद दिली. त्याने दिलेल्या प्रथम खबरीवरून (FIR) आरोपी सर्फराज शेख याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ११८(२) (घातक शस्त्राने गंभीर दुखापत करणे), १२५, ३५२ आणि ३२४(४) (मालमत्तेचे नुकसान करणे) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. आनंदनगर पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत असून फरार आरोपीचा शोध घेत आहेत.
 
Top