धाराशिव (प्रतिनिधी)- खासदार ओमराजे यांचे वडील कै पवनराजे निंबाळकर व त्यांच्या गाडीचा चालक समद काझी दुहेरी हत्याकांड प्रकरणाचा निकाल 16 जुनला लागणार होता. परंतु काही कारणे 20 जून रोजी हा निकाल ठेवण्यात आला आहे. 3 जुन 2006 साली झालेल्या या हत्याकांडाचा तब्बल 20 वर्षानंतर निकाल लागणार असुन याकडे राज्याचे लक्ष लागले आहे. 

मुंबईतील अतिरिक्त सत्र न्यायाधीश तथा विशेष न्यायाधीश एस आर नावंदर यांच्या कोर्टात सुनावणी सुरु आहे. भाजपचे आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांचे वडील माजी गृहमंत्री डॉ. पद्मसिंह पाटील यांच्यासह सर्व 9 आरोपीना कोर्टात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. राजकीय कारकीर्द व अस्तित्वाला धोका निर्माण झाल्याने माजी गृहमंत्री डॉ पद्मसिंह पाटील, सतीश मंदाडे व मोहन शुक्ला यांनी कट रचत सुपारी देऊन हत्या केल्याचा ठपका सीबीआयने दोषारोप पत्रात ठेवला आहे. डॉ. पाटील परिवारातील सदस्य सुद्धा या निकालाच्या वेळी कोर्टात हजर राहू शकतात अशी माहिती आहे. 

3 जुन 2006 रोजी पवनराजे निंबाळकर यांची कळंबोली येथे भरदिवसा गोळ्या घालुन हत्या करण्यात आली. पवनराजे यांची गाडी मुंबई जवळील कळंबोली उडाण पुलाजवळ हात दाखवून थांबविण्यात आली. त्यावेळी पवनराजे हे मागील सीटवर झोपले होते. राजे यांनी उजव्या दरवाज्याची काच खाली घेताच  मारेकऱ्यांनी गोळ्या झाडल्या. कोणताही पुरावा व प्रत्यक्षदर्शी साक्षीदार राहू नये म्हणुन हल्लेखोर असलेल्या 2 शूटरनी समद काझी यांना सुद्धा एक गोळी मारली. गोळी आरपार गेल्याने दोघांचाही जागेवरच मृत्यु झाला. पवनराजे यांच्यावर 2 गोळ्या झाडल्या त्यातील एक गोळी डोक्यात लागली तर काझी यांच्यावर एक गोळी झाडली. दोघे मेल्याची खात्री झाल्यावर शस्त्र व इतर पुरावे नष्ट करून आरोपी फरार झाले. हत्याकांड नंतर 3 वर्षांनी 6 जुन 2009 रोजी माजी गृहमंत्री डॉ पद्मसिंह पाटील यांना खासदार पदावर असताना सीबीआयने अटक केली. पारसमल जैन व दिनेश तिवारी यांनी न्यायाधीश श्रीमती एस बी महाले यांच्या कोर्टात 29 मे 2009 रोजी दिलेल्या जबाबानंतर हत्याकांडाबाबत माहिती बाहेर आली.

 
Top