धाराशिव (प्रतिनिधी)-  राष्ट्रीय परीक्षा एजन्सी नवी दिल्ली यांच्या वतीने रविवार,दि.21 जून 2026 रोजी “पुनर्परीक्षा राष्ट्रीय पात्रता व प्रवेश परीक्षा (पदवीपूर्व)  2026“परीक्षा धाराशिव जिल्हा केंद्रावर आयोजित करण्यात आली आहे.

ही परीक्षा दुपारी 2ते 5.15 या कालावधीत होणार असून,दिव्यांग परीक्षार्थ्यांसाठी परीक्षा वेळ दुपारी 2 ते सायंकाळी 6.20 अशी राहणार आहे.जिल्ह्यातील एकूण पाच उपकेंद्रांवर परीक्षा घेण्यात येणार असून,2072 परीक्षार्थी या परीक्षेस बसणार आहेत. ही परीक्षा धाराशिव जिल्हा मुख्यालयी आयोजित करण्यात आल्याने जिल्ह्यातील विविध तालुक्यांमधून मोठ्या संख्येने विद्यार्थी परीक्षा देण्यासाठी येणार आहेत.या पार्श्वभूमीवर परीक्षार्थ्यांची गैरसोय टाळण्यासाठी जिल्हा प्रशासनाने विशेष नियोजन केले आहे.

प्रत्येक तालुक्यातील बसस्थानकांवरून सकाळी 7 वाजल्यापासून धाराशिव जिल्हा मुख्यालयाकडे जाण्यासाठी बससेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे. परीक्षार्थ्यांनी या सुविधेचा लाभ घ्यावा,असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.तसेच बससेवेसंदर्भात कोणतीही अडचण किंवा समस्या उद्भवल्यास ‌‘आपली एस.टी.'या मोबाईल ॲपद्वारे अथवा संबंधित परिवहन विभागातील अधिकाऱ्यांशी संपर्क साधून आवश्यक मदत मिळविता येणार आहे.

नीट परीक्षेच्या अनुषंगाने विद्यार्थ्यांच्या प्रवासाची सोय सुरळीत राहावी आणि परीक्षा केंद्रांवर वेळेत पोहोचता यावे, यासाठी ही विशेष व्यवस्था करण्यात आल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी तथा नोडल अधिकारी धाराशिव विद्यारण कडवकर यांनी दिली आहे. परीक्षार्थ्यांनी वेळेचे नियोजन करून उपलब्ध बससेवेचा लाभ घ्यावा आणि परीक्षा केंद्रावर निर्धारित वेळेपूर्वी उपस्थित राहावे,असे आवाहनही प्रशासनाने केले आहे.


 
Top