धाराशिव (प्रतिनिधी)- वीरशैव जंगम मठ, सांजावेस गल्ली, धाराशिव यांच्या वतीने आयोजित वयोगट 10 ते 15 वर्षे या विद्यार्थ्यांसाठीच्या चित्रकला प्रशिक्षण वर्ग 2026-2027 चा समारोप तसेच प्रशस्तीपत्र व सन्मानचिन्ह वितरण समारंभ उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.

या प्रशिक्षण वर्गात विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला. प्रशिक्षण पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना प्रशस्तीपत्र व सन्मानचिन्ह प्रदान करून गौरविण्यात आले. विद्यार्थ्यांनी प्रशिक्षणादरम्यान साकारलेल्या कलाकृतींनाही उपस्थितांकडून भरभरून दाद मिळाली. कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून कुलकर्णी, काशीनाथ तात्या दिवटे, डॉ. अनंत राजमाने आणि सोमेश्वर पाळणे उपस्थित होते. मान्यवरांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करून शिक्षणा सोबत कला क्षेत्रातील संधी व कलाशिक्षणाचे महत्त्व विषद केले. विद्यार्थ्यांची नावे जाहीर करणे, त्यांचा परिचय करून देणे व त्यांच्या कलागुणांचे कौतुक करण्याची जबाबदारी त्रिशा गिरीश पाळणे यांनी अतिशय आत्मविश्वासाने पार पाडली. त्यांच्या निवेदनामुळे कार्यक्रमात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले व विद्यार्थ्यांना विशेष प्रोत्साहन मिळाले.

कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन भालचंद्र हुच्चे यांनी केले. प्रशिक्षण वर्गासाठी प्रशिक्षक म्हणून दिपाली संतोष पंडित (आर्ट झोन गॅलरी अँड क्लासेस) यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमास बसवेश्वर बलभीम पाळणे यांचे मोलाचे सहकार्य लाभले. मठाचे अध्यक्ष गिरीश महाबळेश्वर पाळणे, सचिव श्रीकांत गणपतअप्पा साखरे, कोषाध्यक्ष वैजनाथ शिवाप्पा गुळवे तसेच सदस्या व समन्वयक स्नेहल गिरीश पाळणे यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम यशस्वीरीत्या राबविण्यात आला. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी मठाच्या सर्व पदाधिकारी, संचालक मंडळ, पालक व सहकाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले. उपस्थित मान्यवर व पालकांनी या उपक्रमाचे कौतुक करून आयोजकांचे अभिनंदन केले.


 
Top