धाराशिव (प्रतिनिधी)- पवनराजे निंबाळकर हत्या प्रकरणाचा बहुप्रतिक्षित निकाल जाहीर झाल्यानंतर माजी मंत्री डॉ. पद्मसिंह पाटील यांचे पुत्र तथा आमदार राणा जगजीतसिंह पाटील यांनी पहिली प्रतिक्रिया देताना न्यायव्यवस्थेवर विश्वास व्यक्त केला. न्यायदेवतेवर आमचा पूर्ण विश्वास होता आणि आज न्यायदेवतेने न्याय दिला आहे, असे सांगत त्यांनी गेल्या सतरा वर्षांतील मानसिक, वैयक्तिक आणि राजकीय संघर्षाला उजाळा दिला.
निकालानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना राणा पाटील म्हणाले की, या प्रकरणाचा निकाल येण्यासाठी तब्बल सतरा वर्षांचा कालावधी लागला. या दीर्घ काळात संपूर्ण कुटुंबाला प्रचंड मानसिक त्रास सहन करावा लागला. आज न्याय मिळाला असला तरी या सतरा वर्षांत झालेल्या मानसिक वेदना आणि नुकसानाची भरपाई कोण करणार? असा भावनिक सवाल त्यांनी उपस्थित केला. डॉ. पद्मसिंह पाटील यांचा या प्रकरणाशी कोणताही संबंध नसताना त्यांना केवळ राजकीय षडयंत्रातून मुद्दाम गोवण्यात आल्याचा गंभीर आरोपही त्यांनी केला. काही राजकीय शक्तींनी हेतुपुरस्सर त्यांची प्रतिमा मलिन करण्यासाठी हे षडयंत्र रचल्याचे ते म्हणाले. यावेळी बोलताना राणा पाटील भावूक झाले.
आज जरी निकाल लागला असला तरी हा निकाल मी डॉक्टर पद्मसिंह पाटील यांना सांगू शकत नाही आणि सांगितला तरी त्यांना तो समजण्याच्या परिस्थितीत नाहीत. ही आमच्या कुटुंबासाठी अत्यंत वेदनादायी बाब आहे, असे ते म्हणाले. या प्रकरणामुळेच त्यांच्या वडिलांची आजची शारीरिक आणि मानसिक अवस्था निर्माण झाल्याचा दावा त्यांनी केला. राजकीय कारकिर्दीवर झालेल्या परिणामांचा उल्लेख करताना राणा पाटील म्हणाले की, 1990 च्या दशकात डॉ. पद्मसिंह पाटील मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत होते आणि त्यांना तसा शब्दही देण्यात आला होता. मात्र काही कारणांमुळे ते मुख्यमंत्री होऊ शकले नाहीत.
तसेच 2009 मध्ये ते प्रथमच खासदार म्हणून निवडून आले असताना केंद्रीय मंत्रिमंडळ विस्ताराच्या चर्चाही सुरू होत्या. मात्र त्याच काळात त्यांना अटक करण्यात आली. या सर्व घटनांमागे नियोजित राजकीय षडयंत्र असल्याचा आरोप त्यांनी केला. आई तुळजाभवानी आणि संत गोरोबा काकांच्या आशीर्वादामुळेच आज डॉ. पद्मसिंह पाटील यांना या प्रकरणातून निर्दोष मुक्तता मिळाल्याचे राणा पाटील यांनी सांगितले.
तसेच मतदारसंघातील लाखो नागरिकांच्या शुभेच्छा आणि पाठिंब्यामुळे न्यायदेवतेने न्याय दिल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. या प्रकरणाचा काही लोकांनी मोठ्या प्रमाणात राजकीय लाभ घेतला असल्याचा आरोप करताना त्यांनी सांगितले की, या एका प्रकरणामुळे त्यांच्या कुटुंबाचे केवळ वैयक्तिकच नव्हे तर राजकीयदृष्ट्याही मोठे नुकसान झाले. मात्र अखेर सत्याचा विजय झाला असून न्यायव्यवस्थेने दिलेल्या निकालाचे त्यांनी स्वागत केले. सत्याला उशीर होऊ शकतो, पण सत्याचा विजय निश्चित असतो, असे सांगत राणाजगजीतसिंह पाटील यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

