तुळजाभवानी मंदिर संस्थानच्या नव्या सीईओंसमोर आव्हानांचा डोंगर


उपेंद्र तामोरे यांनी स्वीकारला पदभार; विकासकामे, सुलभ दर्शन व्यवस्था आणि भाविकांची फसवणूक रोखण्याची मोठी जबाबदारी

१८६५ कोटींच्या विकास आराखड्याची प्रभावी अंमलबजावणी हे पहिले आव्हान

तुळजापूर : महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मातेच्या मंदिर संस्थानसाठी प्रथमच शासनाने अप्पर जिल्हाधिकारी दर्जाचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून उपेंद्र गोविंद तामोरे यांची नियुक्ती केली आहे. त्यांनी नुकताच पदभार स्वीकारला असून त्यांच्या खांद्यावर विकासकामांपासून ते भाविकांना सुलभ दर्शन मिळवून देण्यापर्यंत अनेक महत्त्वाची आव्हाने आहेत. त्यामुळे ते ही आव्हाने कशी पेलणार, याकडे भाविकांसह तुळजापूरकरांचे लक्ष लागले आहे.

श्री तुळजाभवानी मंदिर व तुळजापूर शहराच्या सर्वांगीण विकासासाठी महाराष्ट्र शासनाने सुमारे १८६५ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. मंदिर परिसर, शहरातील मूलभूत सुविधा, भाविकांसाठी आवश्यक व्यवस्था आणि पर्यटन विकास यांचा या आराखड्यात समावेश आहे. या निधीतील कामे दर्जेदार व वेळेत पूर्ण करून घेणे हे नव्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांसमोरचे सर्वात मोठे प्राथमिक आव्हान ठरणार आहे.

तुळजाभवानी मातेच्या भक्तांमध्ये कष्टकरी, शेतकरी आणि सर्वसामान्य वर्गातील भाविकांची संख्या मोठी आहे. अनेक भाविक तासन्तास रांगेत उभे राहूनही देवीचे समाधानकारक दर्शन घेऊ शकत नसल्याची तक्रार वारंवार पुढे येत आहे. विशेषतः गाभाऱ्यात अनावश्यक व्यक्तींचा वावर वाढल्यामुळे रांगेतील भाविकांना देवीचे मुखदर्शनही व्यवस्थित होत नसल्याने नाराजी व्यक्त केली जात आहे

सध्याच्या दर्शन व्यवस्थेत धर्मदर्शन रांगेतील भाविकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. मंदिराचा प्रवेशद्वार अरुंद असल्याने तसेच चोपदार दरवाजाजवळ सशुल्क दर्शनाची सुविधा असल्यामुळे धर्मदर्शन रांगेतून चार-पाच तास प्रतीक्षा करून आलेल्या भाविकांना अनेकदा सशुल्क दर्शन घेणाऱ्या भाविकांच्या मागूनच दर्शन घ्यावे लागते. याचा सर्वाधिक फटका महिला भाविकांना बसत असल्याचे दिसून येते.

दर्शन व्यवस्थेतील हा भेदभाव दूर करून सर्व भाविकांना समान आणि समाधानकारक दर्शन मिळेल अशी व्यवस्था उभारणे हे तामोरे यांच्यासमोरील महत्त्वाचे आव्हान मानले जात आहे

मंदिर संस्थानमध्ये मोठ्या प्रमाणात कर्मचारी व खासगी सुरक्षा रक्षक कार्यरत असतानाही दर्शन व्यवस्थेतील अनेक त्रुटी कायम आहेत. सशुल्क दर्शन पास नसलेल्या व्यक्तींची रांगेत घुसखोरी, अभिषेक पास इतरांकडून वापरण्याचे प्रकार, तसेच ‘येट दर्शन’ किंवा विशेष दर्शनाच्या नावाखाली भाविकांची आर्थिक फसवणूक होत असल्याच्या तक्रारीही समोर येत असतात.

या प्रकारांना आळा घालून पारदर्शक आणि शिस्तबद्ध व्यवस्था निर्माण करणे आवश्यक असल्याचे भाविकांचे मत आहे.


गाभाऱ्यातील अनावश्यक गर्दी कमी केल्यास भाविकांना देवीचे अधिक स्पष्ट आणि समाधानकारक दर्शन होऊ शकते. तसेच धर्मदर्शन रांगेच्या परिसरात योग्य ठिकाणी रॅम्प किंवा उंच व्यासपीठ उभारल्यास दूरवरून येणाऱ्या भाविकांनाही सहज दर्शन घेता येईल. अशा अनेक उपाययोजनांची अंमलबजावणी करण्याचे आव्हान नव्या सीईओंसमोर आहे.

भाविकांच्या अपेक्षांची परीक्षा!
कमी वेळेत सुलभ दर्शन, विकासकामांची गती, फसवणुकीवर नियंत्रण, पारदर्शक प्रशासन आणि सर्वसामान्य भाविकांना न्याय देणारी व्यवस्था निर्माण करण्यात उपेंद्र तामोरे कितपत यशस्वी ठरतात, यावर त्यांच्या कार्यकाळाचे मूल्यमापन होणार आहे. येत्या काळात ते कोणते निर्णय घेतात आणि मंदिर प्रशासनात कोणते बदल घडवून आणतात, याकडे भाविकांचे लक्ष लागले आहे.
 
Top