धाराशिव तालुक्यातील 65 ग्रामपंचायतींच्या सदस्य आरक्षण निश्चितीचा कार्यक्रम जाहीर
 धाराशिव, दि. 10 जून 2026 : राज्य निवडणूक आयोग, महाराष्ट्र यांच्या आदेशानुसार तसेच जिल्हाधिकारी, धाराशिव यांच्या निर्देशानुसार धाराशिव तालुक्यातील मुदत संपलेल्या व निवडणुकीस पात्र ठरलेल्या एकूण 65 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी सदस्यांच्या आरक्षण निश्चिती व आरक्षण चक्रानुक्रमे फिरविण्याची प्रक्रिया दिनांक 11 जून 2026 व 12 जून 2026 रोजी विशेष ग्रामसभांद्वारे पार पाडण्यात येणार आहे.
 राज्य निवडणूक आयोगाने ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांच्या अनुषंगाने सदस्य संख्या निश्चित करणे, प्रभाग रचना करणे तसेच अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, नागरिकांचा मागास प्रवर्ग व महिलांसाठी राखीव जागांचे आरक्षण निश्चित करून आरक्षण चक्रानुक्रमे फिरविण्याचा कार्यक्रम जाहीर केला आहे. त्या अनुषंगाने धाराशिव तालुक्यातील संबंधित ग्रामपंचायतींमध्ये विशेष ग्रामसभा आयोजित करून आरक्षण सोडत प्रक्रिया पारदर्शक व नियमबद्ध पद्धतीने राबविण्यात येणार आहे.
 सदर कामकाजासाठी तहसीलदार, धाराशिव यांनी मुंबई ग्रामपंचायत निवडणूक नियम, 1959 मधील तरतुदीनुसार विविध मंडळ अधिकारी, विस्तार अधिकारी, ग्राम महसूल अधिकारी व ग्रामपंचायत अधिकारी यांची प्राधिकृत अधिकारी व सहाय्यक म्हणून नियुक्ती केली आहे. नियुक्त करण्यात आलेल्या प्राधिकृत अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली संबंधित ग्रामपंचायतींमध्ये जाहीर वेळापत्रकानुसार आरक्षण सोडत काढण्यात येणार आहे.
 ग्रामपंचायत सदस्यांच्या आरक्षण निश्चितीची ही प्रक्रिया मुंबई ग्रामपंचायत अधिनियम, 1958 तसेच मुंबई ग्रामपंचायत (गावाचे प्रभागात विभाजन करणे व स्त्रिया, अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती यांच्यासाठी जागा राखून ठेवणे) नियम, 1966 मधील तरतुदींनुसार राबविण्यात येणार आहे.
 विशेष ग्रामसभांच्या माध्यमातून ग्रामपंचायत सदस्यांच्या आरक्षणाची सोडत काढण्यात येणार असून त्यामध्ये ग्रामस्थ यांनी उपस्थित राहून प्रक्रियामध्ये सहभागी होण्यासाठी संधी उपलब्ध राहणार आहे. प्रत्येक ग्रामपंचायतीसाठी निश्चित करण्यात आलेल्या दिनांक, वेळ व स्थळी ही कार्यवाही होणार असून त्याची माहिती ग्रामपंचायत कार्यालय, तलाठी कार्यालय व मंडळ अधिकारी कार्यालयाच्या नोटीस बोर्डावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.
 या संपूर्ण प्रक्रियेचा आढावा घेण्यासाठी नियुक्त प्राधिकृत अधिकारी व सहाय्यक अधिकाऱ्यांची बैठक तहसील कार्यालय, धाराशिव येथे आयोजित करण्यात आली असून सर्व आवश्यक सूचना व मार्गदर्शक तत्त्वे संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आली आहेत. आरक्षण निश्चिती संदर्भातील सर्व अहवाल, नमुने व परिशिष्टे विहित मुदतीत तयार करून निवडणूक विभागाकडे सादर करण्याच्या सूचना देखील देण्यात आल्या आहेत.
 निवडणूक कामकाजासाठी नियुक्त करण्यात आलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी आपली जबाबदारी काटेकोरपणे पार पाडावी तसेच कोणत्याही प्रकारची दिरंगाई किंवा निष्काळजीपणा होणार नाही याची दक्षता घ्यावी, असे निर्देश प्रशासनाने दिले आहेत. निवडणूक कामकाजात अडथळा निर्माण करणे अथवा कामकाजात हलगर्जीपणा केल्याचे आढळून आल्यास संबंधितांविरुद्ध लोकप्रतिनिधित्व अधिनियम, 1950 मधील तरतुदीनुसार कार्यवाही करण्यात येईल, असा इशाराही प्रशासनाने दिला आहे.
 तरी सर्व नागरिकांनी आपल्या ग्रामपंचायतीच्या आरक्षण सोडत प्रक्रियेच्या वेळी उपस्थित राहून सहकार्य करावे, असे आवाहन डॉ.मृणाल जाधव तहसीलदार,धाराशिव यांनी केले आहे. 
                                                                             (डॉ. मृणाल जाधव) तहसीलदार, धाराशिव
Next
This is the most recent post.
Previous
Older Post
 
Top