भूम (प्रतिनिधी)-  ग्राहक संरक्षण परिषद धाराशिव व शहरातील महावितरण ग्राहक यांच्या वतीने भूम तालुक्यातील वीज ग्राहकांच्या परवानगीशिवाय स्मार्ट मीटर बसविण्याच्या प्रक्रियेविरोधात तहसीलदारांकडे निवेदन देण्यात आले आहे. 

सदरील निवेदनात असे म्हटले आहे की, मुख्यमंत्री यांनी विधानसभेत स्मार्ट मीटर योजना पूर्णपणे ऐच्छिक असल्याचे स्पष्ट केले असतानाही महावितरणकडून ग्राहकांना मोबाईल संदेश पाठवून विद्यमान मीटर बदलून स्मार्ट मीटर बसविण्याची सूचना केली जात असल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे. अनेक ठिकाणी स्मार्ट मीटरच्या त्रुटींमुळे जादा वीजबिले आल्याच्या तक्रारी असून याबाबत ग्राहकांनी महावितरण कार्यालयांमध्ये धाव घेतली आहे. तरीदेखील ग्राहकांची पूर्वपरवानगी न घेता जुने मीटर काढून स्मार्ट मीटर बसविण्याचे काम सुरू असल्याचा दावा करण्यात आला आहे. तसेच काही ग्राहकांनी स्मार्ट मीटर बसविण्यास विरोध केल्यास किंवा माहिती विचारल्यास त्यांना शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हे दाखल करण्याच्या धमक्या दिल्या जात असल्याचाही आरोप करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर शासनाकडून स्मार्ट मीटर संदर्भात कोणतेही परिपत्रक आले असल्यास ते सार्वजनिक करावे आणि ग्राहकांच्या संमतीशिवाय स्मार्ट मीटर बसविण्याची प्रक्रिया तात्काळ थांबवावी, अशी मागणी ग्राहक संरक्षण परिषदेकडून तहसील प्रशासनाकडे करण्यात आली आहे. 


 
Top