चिंचपूर खुर्द खून प्रकरणातील मुख्य आरोपी कर्नाटकातून जेरबंद

भूम प्रतिनिधी
परंडा तालुक्यातील चिंचपूर खुर्द येथील बहुचर्चित खून प्रकरणातील फरार मुख्य आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने कर्नाटकातील बसवकल्याण येथून शिताफीने ताब्यात घेतले आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, आंबी पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 93/2026 अन्वये भारतीय न्याय संहिता (BNS) कलम 103(1) व 3(5) अंतर्गत खुनाचा गुन्हा दाखल आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी दीपक विक्रम गरड (रा. चिंचपूर खुर्द, ता. परंडा, जि. धाराशिव) हा गुन्ह्यानंतर फरार होता.

फरार आरोपी बसवकल्याण (जि. बीदर, कर्नाटक) येथे असल्याची गोपनीय माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली. पोलीस अधीक्षक रितू खोखर व अपर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विनोद इज्जपवार यांच्या आदेशानुसार विशेष पथक कर्नाटकात रवाना करण्यात आले.

पथकाने मिळालेल्या माहितीच्या आधारे आरोपीचा शोध घेत असताना त्याने पोलिसांना पाहून पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी तत्काळ पाठलाग करून शिताफीने त्याला पकडले आणि ताब्यात घेतले. त्यानंतर पुढील कायदेशीर कारवाईसाठी आरोपीला आंबी पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले.

ही कारवाई पोलीस निरीक्षक विनोद इज्जपवार, सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन खटके, पोलीस हवालदार विनोद जानराव, नितीन जाधवर, बबन जाधवर तसेच पोलीस अंमलदार रोहित दंडनाईक यांच्या पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली.
Next
This is the most recent post.
Previous
Older Post
 
Top