मुरुम (प्रतिनिधी)- दि. 21 जून : जागतिक योग दिनानिमित्त श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालय, उमरगा येथे एन सी. सी, एन एस एस यांच्या वतीने महाविद्यालय योगा केंद्र आणि कॅम्पस मध्ये योग व प्राणायाम शिबिर संपन्न झाले. महाविद्यालय परिसरात आयोजित शिबिरात आरोग्य आणि पर्यावरण संवर्धनाचा प्रभावी संदेश देण्यात आला.
यावेळी प्राचार्य डॉ. संजय अस्वले यानी शिबिराच्या समारोप प्रसंगी प्राणायामामुळे श्वसनसंस्था सुदृढ होते, मन शांत राहते आणि जीवनशैलीत सकारात्मक बदल घडतो परंतु योग आणि प्राणायाम केवळ शारीरिक व मानसिक आरोग्यासाठीच नव्हे, तर पर्यावरणाशी सुसंवाद साधण्यासाठीही महत्त्वाचे आहेत. पृथ्वी, जल, वायू, अग्नी आणि आकाश या पंचमहाभूतांवर मानवाचे अस्तित्व अवलंबून आहे. स्वच्छ हवा, शुद्ध पाणी आणि संतुलित निसर्गाशिवाय निरोगी जीवन शक्य नाही. त्यामुळे योगासोबत पर्यावरण संवर्धनाची जबाबदारी प्रत्येकाने स्वीकारली पाहिजे असे प्रतिपादन केले.
महाविद्यालय योग केंद्रात जेष्ठ नागरिकांसाठी योग प्रशिक्षक श्री अशोक स्वामी यांनी तर महाविद्यालय परिसर शिबिरात योग शिक्षक डॉ. जी. एन. सोमवंशी यांनी योग व प्राणायामाचे महत्त्व सांगितले. त्यांनी विविध योगासने व प्राणायामाची प्रात्यक्षिके करून दाखवली. यावेळी उपप्राचार्य डॉ. विनोद देवरकर, पर्यवेक्षक शैलेश महामुनी, राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी डॉ. एस. एस. शेळके, मुरली जाधव यांच्यासह प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी, सी.सी. कॅडेट्स आणि राष्ट्रीय सेवा योजनेचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमातून “निरोगी व्यक्ती, निरोगी समाज आणि संतुलित पर्यावरण“ हा संदेश देण्यात आला.
