कळंब पोलीस ठाण्याच्या प्रभारी पदी शकील शेख; शहरातील गुंडगिरी, टवाळखोरी आणि अवैध धंद्यांवर आता लगाम बसणार का?
कळंब | कळंब
कळंब शहरातील कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने महत्त्वाची घडामोड घडली असून धाराशिव सायबर सेलमधून कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून ओळख असलेल्या पोलीस निरीक्षक शकील शेख यांची कळंब पोलीस ठाण्याच्या प्रभारी पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांनी दि. ३१ मे रोजी पदभार स्वीकारत कामकाजाला सुरुवात केली आहे.
कळंब शहरात गेल्या काही महिन्यांपासून अवैध धंदे, अवैध वाहतूक, बसस्थानक परिसरातील टवाळखोरी, हाणामाऱ्या, खिसेकापूंचा त्रास, मोबाईल चोरीच्या घटना, बाजारपेठेतील दादागिरी आणि अस्ताव्यस्त पार्किंग यांसारख्या समस्या नागरिकांसाठी डोकेदुखी ठरत आहेत. त्यामुळे नव्या प्रभारी अधिकाऱ्यांसमोर मोठे आव्हान उभे ठाकले आहे.
माजी पोलीस निरीक्षक अजित चिंतले यांनी आपल्या कार्यकाळात अवैध धंदे आणि गुन्हेगारी प्रवृत्तींवर नियंत्रण आणण्यासाठी प्रयत्न केले होते. मात्र, शहरातील काही भागांत चोरी, मारामाऱ्या आणि सार्वजनिक ठिकाणांवरील गैरप्रकार अद्यापही पूर्णपणे थांबलेले नाहीत. याच पार्श्वभूमीवर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी शकील शेख यांच्यावर विश्वास दाखवत कळंबची जबाबदारी सोपवली आहे.
नागरिकांच्या अपेक्षांचा डोंगर!
कळंबकरांच्या अपेक्षा आता थेट नव्या प्रभारी पोलीस निरीक्षकांकडे लागल्या आहेत. बसस्थानक परिसरातील टवाळखोर टोळ्या, आठवडी बाजारातील मोबाईल चोर, बाजारपेठेतील दादागिरी, वाहतूक कोंडी आणि बेकायदेशीर धंद्यांवर शकील शेख कितपत प्रभावी कारवाई करतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
तसेच पोलीस ठाण्यात दाखल होणाऱ्या तक्रारींचा निपटारा निष्पक्षपणे आणि तातडीने होणार का? सर्वसामान्य नागरिकांना न्याय मिळणार का? हे देखील आगामी काळात स्पष्ट होणार आहे.
जयंती उत्सव आणि निवडणुकांचे आव्हान
येत्या काळात विविध जयंती उत्सव, धार्मिक कार्यक्रम तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची धामधूम सुरू होणार आहे. अशा परिस्थितीत कायदा व सुव्यवस्था अबाधित राखत संवेदनशील परिस्थिती हाताळण्याची मोठी जबाबदारी शकील शेख यांच्या खांद्यावर असणार आहे.
कळंब शहर गुंडगिरीमुक्त, टवाळखोरीमुक्त आणि सुरक्षित करण्यासाठी नव्या प्रभारी अधिकाऱ्यांची कारवाई किती प्रभावी ठरते, याकडे आता संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.
 
Top