भूम (प्रतिनिधी)-  धाराशिव जिल्ह्यातील सिद्धक्षेत्र कुंथलगिरी येथे दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ संत, वात्सल्य रत्नाकर आचार्य श्री 108 सन्मतीसागरजी महाराज यांचे परमशिष्य तथा समयमूर्ती, वात्सल्य वारिधी क्षपकराज आचार्य श्री 108 वर्धमान सागर महाराज (दक्षिण) यांनी मंगळवार, 23 जून रोजी संथारा (सल्लेखना) व्रताची घोषणा केली. शनिवारी या महासाधनेचा पाचवा दिवस पूर्ण झाला असून देशभरातील हजारो जैन भाविक कुंथलगिरी येथे दर्शनासाठी आणि आशीर्वाद घेण्यासाठी दाखल होत आहेत.

आचार्य श्री वर्धमान सागर महाराज हे दिगंबर जैन परंपरेतील अत्यंत आदरणीय संत असून, त्यांनी संपूर्ण आयुष्य कठोर तपश्चर्या, संयम, त्याग आणि आत्मसाधनेसाठी समर्पित केले आहे. सल्लेखना हे जैन धर्मातील सर्वोच्च आध्यात्मिक व्रत मानले जाते. देहावरील आसक्तीचा त्याग करून शांतचित्ताने आत्मकल्याणाच्या दिशेने वाटचाल करण्याचा हा आध्यात्मिक मार्ग असून त्याला जैन धर्मात विशेष महत्त्व आहे.

कुंथलगिरी ट्रस्टचे विश्वस्त उमंग शाह यांनी सांगितले की, सल्लेखना व्रताच्या पार्श्वभूमीवर दररोज पाच हजारांहून अधिक जैन भाविक व श्रावक-श्राविका सिद्धक्षेत्राला भेट देत आहेत. भाविकांच्या सोयीसाठी ट्रस्टकडून व्यापक नियोजन करण्यात आले असून सुमारे 60 कर्मचारी व 50 हून अधिक स्वयंसेवक सेवा बजावत आहेत. सध्या सिद्धक्षेत्र कुंथलगिरी येथे नऊ दिगंबर जैन मुनिराज आणि एक आर्यिका माताजी यांचे वास्तव्य असून, संपूर्ण परिसरात धार्मिक वातावरण निर्माण झाले आहे. देशाच्या विविध भागांतून येणाऱ्या भाविकांमुळे कुंथलगिरी येथे आध्यात्मिक उत्साहाचे वातावरण असून आचार्य श्रींच्या दर्शनासाठी आणि धर्मोपदेशासाठी मोठी गर्दी होत आहे.

 
Top