धाराशिव (प्रतिनिधी)- राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीम शंभर टक्के यशस्वी करण्यासाठी पाच वर्षांखालील एकही बालक पोलिओ लसीकरणापासून वंचित राहू नये, यासाठी सर्व संबंधित विभागांनी समन्वयाने कार्य करावे,असे आवाहन जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार यांनी केले.
राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेच्या अनुषंगाने जिल्हा समन्वय समितीची बैठक जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार यांच्या अध्यक्षतेखाली तसेच जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी प्रियंवदा म्हाडदळकर यांच्या प्रमुख उपस्थितीत नुकतीच पार पडली.
बैठकीच्या प्रारंभी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.सतीष हरिदास यांनी उपस्थितांचे स्वागत करून मोहिमेची माहिती दिली. त्यांनी सांगितले की, पोलिओ या आजाराचे समूळ उच्चाटन मार्च 2014 मध्ये झाले असून, याबाबत जागतिक आरोग्य संघटनेचे प्रमाणपत्र भारताला प्राप्त झाले आहे. मात्र,काही देशांमधून या आजाराचा धोका निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेऊन जागतिक आरोग्य संघटनेच्या निर्देशानुसार केंद्र सरकारकडून दरवर्षी देशभरात एकाच दिवशी राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण दिवस आयोजित केला जातो. मतदान प्रक्रियेच्या धर्तीवर या मोहिमेत लाभार्थ्यांना पूर्वसूचना स्लिपचे वितरण, लसीकरण बूथची उभारणी आणि लस दिल्यानंतर बोटावर शाईचे चिन्हांकन करण्यात येते, जेणेकरून एकही पात्र बालक लसीकरणापासून वंचित राहणार नाही.
जिल्हा प्रजनन व बाल आरोग्य अधिकारी डॉ.कुलदीप मिटकरी यांनी मोहिमेची सविस्तर माहिती देताना सांगितले की,रविवार,दि.28 जून 2026 रोजी धाराशिव जिल्ह्यात राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीम राबविण्यात येणार असून त्यासाठी आरोग्य यंत्रणा पूर्णपणे सज्ज आहे.जिल्ह्यात पाच वर्षांखालील एकूण 1 लाख 63 हजार 329 बालके असून त्यांच्या लसीकरणासाठी ग्रामीण भागात 1 हजार 101 आणि शहरी भागात 125 अशा एकूण 1 हजार 226 लसीकरण बूथची व्यवस्था करण्यात आली आहे.
लसीकरणासाठी 3 हजार 368 कर्मचारी नियुक्त करण्यात आले असून पर्यवेक्षणासाठी वैद्यकीय अधिकारी,तालुका आरोग्य अधिकारी,जिल्हास्तरीय व तालुकास्तरीय पर्यवेक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे.बसस्थानके, रेल्वे स्थानके,बाजारपेठा, विटभट्ट्या,साखर कारखाने,यात्रा आणि लग्न समारंभाच्या ठिकाणीही पोलिओ डोस पाजण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.तसेच भटक्या वसाहती आणि ऊसतोड कामगारांच्या वस्त्यांमधील बालकांसाठी विशेष मोबाईल पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे.
जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी प्रियंवदा म्हाडदळकर यांनी मार्गदर्शन करताना मोहिमेच्या कालावधीत शून्य ते पाच वर्षे वयोगटातील एकही बालक लसीकरणापासून वंचित राहणार नाही,यासाठी काटेकोर नियोजन करून मोहीम यशस्वी करण्याचे निर्देश दिले.
यावेळी जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार यांनी ग्रामस्तरावर शालेय विद्यार्थ्यांच्या प्रभात फेऱ्यांचे आयोजन करून राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेबाबत व्यापक जनजागृती करण्याच्या सूचना दिल्या.सर्व पालकांनी आपल्या पाच वर्षांखालील बालकांना पोलिओ लसीचे दोन थेंब पाजून मोहिमेला यशस्वी करावे, असे आवाहन त्यांनी केले.
बैठकीस मुख्य कार्यकारी अधिकारी प्रियंवदा म्हाडदळकर,जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.धनंजय चाकुरकर,जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.सतीष हरिदास,उपमुख्य कार्यकारी अधिकारी (बालकल्याण) देवदत्त गिरी,जिल्हा प्रजनन व बाल आरोग्य अधिकारी डॉ.कुलदीप मिटकरी,निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ.शिवाजी फुलारी,शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे डॉ.एल.एल.गायकवाड व डॉ. गोसावी,सहाय्यक संचालक (कुष्ठरोग) डॉ.मारुती कोरे,जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ.बनसोडे, वैद्यकीय अधीक्षक डॉ.स्मिता गवळी,आयएपीचे अध्यक्ष डॉ.डी. एस.खुणे,आयुर्वेदिक महाविद्यालयाचे डॉ.मनोज बाबर, शिक्षण विभागाचे प्रतिनिधी डी.एम. जंगम व बी.डी.देवगुडे,समाज कल्याण विभागाचे प्रतिनिधी संतोष तांबे,महाराष्ट्र राज्य विद्युत विभागाचे प्रतिनिधी आर.एच.पवार,महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या प्रतिनिधी टी.आर.म्हेत्रे,जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक डॉ.रामेश्वर यादव,जिल्हा लेखा व्यवस्थापक जीवन कुलकर्णी,जिल्हा सनियंत्रण व मूल्यमापन अधिकारी किशोर तांदळे तसेच गणेश पवार,सुनिता शेजवळ,ताजुद्दीन मोमीन,श्री. लोखंडे,कलीम शेख आणि आरोग्य विभागाचे कर्मचारी उपस्थित होते.
