धाराशिव (प्रतिनिधी)-  एकत्रित आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना आणि महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत लाभार्थ्यांची ई-केवायसी करून आयुष्मान कार्ड उपलब्ध करून देण्यासाठी धाराशिव जिल्ह्यात विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे.जिल्हाधिकारी,मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद तथा अध्यक्ष जिल्हा परिषद यांच्या सूचनेनुसार ही मोहीम 22 जून ते 21 जुलै 2026 या कालावधीत राबविण्यात येणार आहे. ऑगस्ट अखेर आयुष्मान कार्ड 100 टक्के उद्दिष्ट पूर्ण करणार असल्याची माहिती शासकीय सुत्रांनी दिली आहे. 

आयुष्मान भारत-प्रधानमंत्री जन आरोग्य योजना अंतर्गत धाराशिव जिल्ह्यात सध्या 15.23 लाख लाभार्थी असून त्यापैकी 7.83 लाख लाभार्थ्यांची आयुष्मान कार्डासाठी ई-केवायसी पूर्ण झाली आहे. उर्वरित लाभार्थ्यांची ई-केवायसी पूर्ण करण्यासाठी आशा कर्मचारी,स्वस्त धान्य दुकान चालक तसेच आपले सरकार सेवा केंद्रातील कर्मचाऱ्यांची मदत घेण्यात येणार आहे. शासनाकडून प्रत्येक यशस्वी ई-केवायसीसाठी 20 रुपये आणि आयुष्मान कार्ड वितरणासाठी 10 रुपये असे एकूण 30 रुपये मानधन देण्यात येत आहे. या योजनेअंतर्गत प्रति कुटुंब दरवर्षी पाच लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार आणि शस्त्रक्रियांचा लाभ उपलब्ध आहे. सुमारे 2399 आजारांवरील उपचार या योजनेत समाविष्ट असून, जिल्ह्यातील 25 खाजगी व 15 शासकीय अशा एकूण 40 रुग्णालयांमध्ये तसेच जिल्ह्यातील 45 प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये ही सुविधा उपलब्ध आहे. याशिवाय महाराष्ट्रातील सुमारे 4500 शासकीय व खाजगी रुग्णालयांमध्येही लाभार्थ्यांना उपचारांचा लाभ घेता येणार आहे. लाभार्थ्यांना ग्रामपंचायत स्तरावर आपले सरकार सेवा केंद्र,सीएससी केंद्र,आशा स्वयंसेविका आणि आरोग्य कर्मचाऱ्यांमार्फत आयुष्मान कार्ड मोफत उपलब्ध करून देण्यात येणार आहे.तसेच 70 वर्षे व त्यावरील ज्येष्ठ नागरिकांनी ‌‘आयुष्मान वय वंदना कार्ड' काढून घ्यावे,असे आवाहन प्रशासनाने केले आहे. 

 
Top