भूम (प्रतिनिधी)- धाराशिव-बीड-लातूर स्थानिक स्वराज्य संस्था विधानपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज भूम-परंडा-वाशी विधानसभा मतदारसंघातील आगामी रणनीती आणि विविध जनहिताच्या मुद्द्यांवर सविस्तर आढावा बैठक संपन्न झाली.
या बैठकीत मतदारसंघातील जिल्हा परिषद सदस्य, सभापती, नगरसेवक, पंचायत समिती सदस्य आणि प्रमुख पदाधिकाऱ्यांशी थेट संवाद साधत विविध विषयांवर सखोल चर्चा करण्यात आली. आगामी काळात शिवसेना पक्षाची ध्येयधोरणे तळागाळातील प्रत्येक नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी “गाव तिथे शिवसेना, घर तिथे शिवसैनिक“ हे अभियान अधिक गतीने आणि प्रभावीपणे राबवण्याचा संकल्प यावेळी आम्ही सर्वांनी मिळून केला.
यंदा अद्याप मान्सूनचे आगमन झाले नसून, 'एल निनो'च्या प्रभावामुळे कमी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. या गंभीर परिस्थितीची पूर्वतयारी म्हणून तालुक्यातील पूर्वतयारी, पेरणीचे नियोजन आणि पशुधनाच्या सुरक्षेबाबत सखोल चर्चा करण्यात आली. तसेच संभाव्य पाणीटंचाई लक्षात घेता गरजेनुसार टँकरद्वारे पाणीपुरवठा करणे आणि चारा छावण्यांचे आगाऊ नियोजन करण्याबाबत सर्व यंत्रणांना सज्ज राहण्याचे निर्देश दिले.
बैठकीदरम्यान प्रत्येक जिल्हा परिषद गट आणि पंचायत समिती गणनिहाय सुरू असलेल्या विकासकामांची गती तपासण्यात आली, तसेच ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या विविध प्रलंबित विकासकामांना गती देण्याचे निर्देश दिले. अनेक गावांमध्ये महावितरणकडून () सुरळीत वीजपुरवठा होत नसल्याच्या तक्रारी नागरिकांनी मांडल्या होत्या, याची गंभीर दखल घेत संबंधित वीज अधिकाऱ्यांना तात्काळ व अखंडित वीजपुरवठा करण्याचे कडक निर्देश यावेळी देण्यात आले.
याच बैठकीचे औचित्य साधून जिल्हा परिषद शिवसेना गटनेते संदेश (विकी) चव्हाण आणि जिल्हा परिषद सदस्य सुनील उंदरे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या. या महत्त्वपूर्ण आढावा बैठकीला जिल्हाप्रमुख दत्ता अण्णा साळुंखे, परंडा नगराध्यक्ष जाकिर भाई सौदागर, भूम माजी नगराध्यक्ष संजय नाना गाढवे, नवनाथ अप्पा जगताप,भैरवनाथ शुगर वर्क्स लि.चे व्हाईस चेअरमन श्री. केशव सावंत, श्री.रामचंद्र घोगरे, सर यांच्यासह सर्व प्रमुख शिवसेना पदाधिकारी, नवनिर्वाचित जिल्हा परिषद सदस्य, नवनिर्वाचित नगरसेवक, पंचायत समिती सदस्य, महिला आघाडीच्या पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने निष्ठावंत शिवसैनिक व कार्यकर्ते उपस्थित होते. आपल्या भूम-परंडा-वाशी मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी व जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही सर्वजण अविरतपणे कटिबद्ध आहोत.
