स्वच्छता ठप्प; 20 अकुशल कर्मचाऱ्यांच्या तात्काळ नेमणुकीची मागणी
भूम (जि. धाराशिव)
भूम नगर परिषद हद्दीत घनकचरा व्यवस्थापनाचा टेंडर 31 मे रोजी संपुष्टात आल्याने शहरातील स्वच्छता व्यवस्था ठप्प झाली आहे. या पार्श्वभूमीवर नगर परिषद गटनेते रुपेश (अप्पा) परमेश्वर शेंडगे यांनी मुख्याधिकाऱ्यांकडे निवेदन देत तात्काळ उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.
निवेदनानुसार, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमुळे लागू झालेल्या आचारसंहितेमुळे सर्वसाधारण सभा घेणे शक्य नसल्याने स्वच्छतेचा प्रश्न अधिकच गंभीर बनला आहे. शहरातील नाल्यांची नियमित सफाई होत नसल्याने पावसाळ्यात नाले तुंबण्याचा धोका निर्माण झाला असून, त्यामुळे सार्वजनिक आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
महाराष्ट्र नगरपालिका अधिनियम, 1965 मधील तरतुदीनुसार नगर परिषदेला सार्वजनिक स्वच्छता राखणे बंधनकारक असताना सद्यस्थिती चिंताजनक असल्याचे शेंडगे यांनी नमूद केले आहे.
त्यामुळे आपत्कालीन परिस्थिती लक्षात घेऊन घंटागाडी व नाली सफाईसाठी तात्काळ 20 अकुशल कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. ही बाब “तातडीची व अनिवार्य सेवा” अंतर्गत येत असल्याने कोणतीही विलंब न करता प्रशासनाने तातडीने कार्यवाही करावी, असेही निवेदनात नमूद करण्यात आले
यावेळी गटनेते रुपेश आप्पा शेंडगे, बांधकाम तथा स्वच्छता सभापती अनिल दादा शेंडगे, नियोजन सभापती रामराजे कुंभार, नगरसेवक चंद्रमणी गायकवाड, नगरसेवक विठ्ठल बागडे, नगरसेवक अमोल गाडे ,दीपक पवार व नागरिक उपस्थित होते.