प्रतिनिधी |भूम
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती उत्सव निमित्त शहरात गुरुवार, दि.११ जून रोजी विविध धार्मिक, सांस्कृतिक व सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या अनुषंगाने नुकतीच उत्सव समितीची बैठक पार पडली. यावेळी
जय हनुमान ग्रुपचे अध्यक्ष सुरेश कांबळे, यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या बैठकीत उत्सव समितीची निवड करण्यात आली. यामध्ये उत्सव समिती प्रमुखपदी गजानन सोलंकर, अध्यक्षपदी आण्णा महानवर तर कार्याध्यक्षपदी राहुल पाटील यांची निवड करण्यात आली.जयंतीनिमित्त सकाळी ९ वाजता नगर परिषद समोर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात येणार आहे. दुपारी ३ वाजता एस.टी. डेपो परिसरातून भव्य मिरवणूक काढण्यात येणार असून ती शहरातील प्रमुख मार्गांवरून मार्गक्रमण करणार आहे. रात्री १० वाजता समारोप कार्यक्रमाने उत्सवाची सांगता होणार आहे.
मिरवणुकीत धनगरी ओव्या, धनगरी नृत्य, बँजो, गजरे ढोल पथक, वाजंत्री, डफ पथक तसेच दांडपट्टा पथक सहभागी होणार असल्याने उत्सवाला विशेष रंगत येणार आहे. पारंपरिक लोककला आणि सांस्कृतिक वारशाचे दर्शन घडविणाऱ्या या कार्यक्रमांकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या लोककल्याणकारी कार्याचा आदर्श समाजापुढे ठेवत जयंती उत्साहात साजरी करण्यासाठी सकल धनगर समाजाने व्यापक तयारी केली असून समाजबांधवांसह नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे अवहान केले आहे.
 
Top