तुळजापूर
 जिद्द, मेहनत आणि शिक्षणाची प्रबळ इच्छा यांच्या जोरावर तुळजापूर तालुक्यातील सावरगाव येथील सामान्य कुटुंबातील सिद्धी संतोष देशपांडे हिने डॉक्टर होण्याच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल टाकले आहे. एमबीबीएस चे वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी ती नुकतीच दवाओ मेडिकल कॉलेज फिलिपिन्सला रवाना झाली असून तिच्या या यशाबद्दल परिसरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे. तिने महाविद्यालयीन शिक्षणात सातत्याने उत्कृष्ट कामगिरी केली. डॉक्टर बनून समाजसेवा करण्याचे स्वप्न उराशी बाळगून तिने परदेशात एमबीबीएस चे वैद्यकीय शिक्षण घेण्याचा निर्णय घेतला. कुटुंबीयांनीही अनेक अडचणींवर मात करत तिच्या शिक्षणासाठी मोलाचे सहकार्य केले.

सिद्धी च्या या यशामुळे कुटुंबीयांमध्ये आनंदाचे वातावरण असून नातेवाईक, मित्रपरिवार आणि ग्रामस्थांनी तिचे अभिनंदन केले आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी तिची ही यशोगाथा प्रेरणादायी ठरत आहे.

यावेळी सिद्धीने आपल्या यशाचे श्रेय वडील संतोष तात्यासाहेब देशपांडे. आई अर्चना संतोष देशपांडे , आजोबा तात्यासाहेब केशवराव देशपांडे , शिक्षक आणि मार्गदर्शकांना दिले. वैद्यकीय शिक्षण पूर्ण करून देशात परतल्यानंतर सर्वसामान्य रुग्णांची सेवा करण्याची इच्छा तिने व्यक्त केली.

सामान्य कुटुंबातून आलेल्या या विद्यार्थिनीने दाखविलेली जिद्द आणि चिकाटी इतर विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरत असून तिच्या उज्ज्वल भविष्यासाठी सर्व स्तरांतून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
 
Top