धाराशिव (प्रतिनिधी)- विठुरायाच्या पवित्र भूमीत पंढरपूर येथे शेतकरी कर्जमाफीच्या निकषात बदल करण्याचा शब्द सरकारने दिला होता. मात्र तो शब्द न पाळता लाखो शेतकऱ्यांची फसवणूक करण्यात आली असून सरकारचा हा विश्वासघात शेतकरी सहन करणार नाहीत, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी दिला. कर्जमाफीतील जाचक निकष हटविण्यासाठी 29 जून रोजी छत्रपती संभाजीनगर येथे लाखो शेतकऱ्यांचा एल्गार पाहायला मिळेल, असे आमदार पवार यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
यावेळी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष प्रतापसिंह पाटील, जीवनराव गोरे, मनिषा राखुंडे, प्रदेश युवती राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्याध्यक्षा मेघा सस्ते उपस्थित होते. यावेळी बोलताना रोहित पवार म्हणाले की, शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी मिळावी आणि कर्जमाफीतील जाचक निकष रद्द करावेत, या मागणीसाठी पंढरपूर येथे आमरण उपोषण करण्यात आले होते. त्यावेळी सरकारने कर्जमाफीतील निकष हटवून सरसकट कर्जमाफी करण्याचे आश्वासन दिले होते. यासाठी सरकारने 22 जूनपर्यंतचा अवधी मागितला होता. मात्र दिलेल्या मुदतीत सरकारने या विषयावर एकही बैठक घेतली नाही, असा आरोप त्यांनी केला. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पवित्र नावाने कर्जमाफी योजना राबविण्याचा निर्णय सरकारने घेतला असला, तरी प्रत्यक्षात या योजनेतून शेतकऱ्यांची फसवणूक होत असल्याचा आरोपही त्यांनी केला.
विधान परिषद निवडणुकीतील मतदानाच्या गद्दारीवरून कारवाई करण्याचा इशारा आमदार पवार यांनी दिली. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातून फुटून गेलेल्या सहा खासदारांवरही रोहित पवार यांनी गंभीर आरोप केले. यावेळी आमदार पवार यांनी खासदार ओमराजे निंबाळकर व आमदार राणाजगजितसिंह पाटील यांचा उल्लेख करून दोन कुटुंबांच्या वादामुळे जिल्ह्याच्या विकासाला खीळ बसत असल्याची टिका केली.
