खत टाकताना विजेचा धक्का; शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू
-तुळजापूर -
तुळजापूर तालुक्यातील खंडाळा येथे उसाच्या शेतात खत टाकण्याचे काम सुरू असताना विजेच्या तारेला हात लागून एका शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी (दि. ११) सकाळी सुमारे ९ वाजण्याच्या सुमारास घडली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, सुमारे ४० वर्षीय शेतकरी नामदेव गौतम जाधव आपल्या उसाच्या शेतात खत टाकण्याचे काम करत होता. यावेळी शेतातून गेलेल्या विद्युत तारेशी संपर्क आल्याने त्याला जोरदार विजेचा धक्का बसला. या अपघातात त्याचा जागीच मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे.
घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. अचानक घडलेल्या या दुर्घटनेमुळे कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून गावात शोककळा पसरली आहे.
मृत शेतकरी हा आपल्या कुटुंबाचा आधारस्तंभ असल्याचे सांगितले जात आहे. त्याच्या अकाली निधनामुळे कुटुंब उघड्यावर आल्याची भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली. शेतकरी कुटुंबावर ओढवलेल्या या संकटामुळे शासनाने तत्काळ आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे. खंडाळ भागात सैल तारांचा प्रश्न गंभीर बनला आहे महावितरणाच्या अनागोंदी कारभार नामदेव जाधव यांच्या मुत्युरस कारणीभूत असल्याचा आरोप ग्रामस्थांन मधुन केला जात आह
दरम्यान, घटनेची नोंद संबंधित यंत्रणांकडून घेण्यात येत असून पुढील तपास सुरू आहे. खंडाळा परिसरात घडलेल्या या दुर्दैवी घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.