तुळजापूर (प्रतिनिधी)- श्री तुळजाभवानी मंदिर परिसर स्वच्छ, सुंदर आणि पवित्र राखण्यासाठी श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान, तुळजापूर यांच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या विशेष स्वच्छता मोहिमेअंतर्गत नियमभंग करणाऱ्यांविरोधात दंडात्मक कारवाई सातत्याने सुरू आहे. या मोहिमेअंतर्गत गेल्या सहा दिवसांत एकूण 51 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.
मंदिर प्रशासनाने नियुक्त केलेल्या विशेष पथकांमार्फत दिनांक 09 जून 2026 रोजी 8 हजार 500 रुपये, दिनांक 10 जून रोजी 10 हजार 500 रुपये, दिनांक 11 जून रोजी 8 हजार रुपये, दिनांक 12 जून रोजी 10 हजार 500 रुपये, दिनांक 13 जून रोजी 6 हजार 500 रुपये तसेच दिनांक 14 जून रोजी 7 हजार रुपये इतका दंड वसूल करण्यात आला.
मंदिर परिसरात थुंकणे, कचरा टाकणे तसेच परिसराच्या स्वच्छता आणि पावित्र्यास बाधा पोहोचविणाऱ्या कृत्यांबाबत मंदिर प्रशासनाने कडक भूमिका घेतली असून, अशा प्रकारांविरोधातील कारवाई पुढेही अधिक प्रभावीपणे सुरू राहणार असल्याचे मंदिर प्रशासनाने स्पष्ट केले आहे. आई तुळजाभवानीच्या दर्शनासाठी देशभरातून लाखो भाविक तुळजापूर येथे येत असतात. या पवित्र क्षेत्राचे धार्मिक महत्त्व आणि स्वच्छता अबाधित राखण्यासाठी सर्व भाविक, पुजारी, व्यापारी तसेच नागरिकांनी स्वच्छता नियमांचे काटेकोर पालन करून मंदिर प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानच्या वतीने करण्यात आले आहे.