धाराशिव (प्रतिनिधी)- विधान परिषदेच्या उस्मानाबाद बीड व लातुर या स्थानिक स्वराज मतदार संघासाठी 18 जुनला मतदान होणार असुन 988 पैकी जवळपास 41 मतदारांनी सहायक देण्याची मागणी जिल्हाधिकारी तथा निवडणुक निर्णय अधिकारी कीर्ती किरण पुजार यांच्याकडे केली आहे. हे 41 मतदार निरक्षर असुन त्यांना अक्षर ओळख नसल्याने कोणत्या उमेदवाराला मतदान करायचे याचे मतपत्रिकेवरील नाव वाचण्यासाठी त्यांनी सहायक देण्याची मागणी केली आहे. हे मतदार लातुर व बीड जिल्ह्यातील असुन त्यात नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्यांचा समावेश आहे. त्यामुळे साक्षर भारतचा दावा करणाऱ्यांचा दावा फोल ठरला आहे.
विधान परिषद हे वरिष्ठ सभागृह मानले जाते. उस्मानाबाद बीड लातुर मतदार संघातील काही मतदार यांना वाचता येत नसल्याचा त्यांचा दावा आहे, त्यामुळे त्यांनी मतदान करताना सहायक देण्याची मागणी केली आहे. जवळपास 41 अर्ज प्राप्त झाले असुन जिल्हा प्रशासन या अर्ज व त्यांनी केलेल्या दाव्यांची पडताळणी करीत आहे व अर्जाची छानणी सुरु आहे.
शपथपत्र पाहणे महत्वाचे
स्थानिक स्वराज निवडणुक लढवताना त्यांनी सादर केलेले शपथ पत्र व त्यातील शैक्षणिक पात्रता, मीटिंग प्रोसिडिग याची पडताळणी होणे गरजेचे आहे. त्यातून सत्य उघड होऊ शकते. विधान परिषद निवडणुक ही घोडे बाजारसाठी ओळखली जाते. कोणाला मतदान केले यावर विश्वास बसावा यासाठी अनेक क्लुप्त्या वापरल्या जातात त्यापैकी ही एक असावी अशीही चर्चा आहे. निरक्षर असलेल्या मतदार यांना साक्षर करण्यासाठी सरकारने शिक्षा वर्ग किंवा उपाय योजना करण्याची मागणी होता आहे.