धाराशिव (प्रतिनिधी)-  महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा-2026 ही रविवार, दि.28 जून 2026 रोजी धाराशिव जिल्ह्यात आयोजित करण्यात आली असून परीक्षेच्या पार्श्वभूमीवर परीक्षा केंद्र परिसरात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी तसेच परीक्षेचे कामकाज सुरळीत पार पडावे यासाठी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 च्या कलम 163 अन्वये प्रतिबंधात्मक आदेश जारी करण्यात आले आहेत.हे आदेश दि.28 जून रोजी सकाळी 8 ते सायंकाळी 7 या कालावधीत लागू राहणार आहेत.

ही परीक्षा सकाळी 10 ते सायंकाळी 5 या वेळेत घेण्यात येणार असून धाराशिव शहरातील विविध शाळा व महाविद्यालयांमध्ये परीक्षा केंद्रांची व्यवस्था करण्यात आली आहे. अभिनव इंग्लिश स्कूल,ग्रीनलँड पब्लिक स्कूल,तेरणा पब्लिक स्कूल, छत्रपती शिवाजी हायस्कूल, गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक कॉलेज,श्री श्री रविशंकर विद्यालय,रामकृष्ण परमहंस महाविद्यालय,आर्य चाणक्य विद्यालय,भारत विद्यालय,शम्स उलूम उर्दू शाळा,श्रीपतराव भोसले हायस्कूल,जिल्हा परिषद मुलींची हायस्कूल,तेरणा कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय,प्रियदर्शनी मराठी प्राथमिक शाळा,सह्याद्री इंटरनॅशनल स्कूल,सरस्वती हायस्कूल,शरद पवार हायस्कूल आणि विद्यामाता हायस्कूल यांसह एकूण 21 केंद्रांवर परीक्षा घेण्यात येणार आहे.

परीक्षा केंद्र परिसरात कोणताही बाह्य उपद्रव होऊ नये,परीक्षार्थ्यांना अडथळा निर्माण होऊ नये तसेच परीक्षेची गोपनीयता व शिस्त अबाधित राहावी यासाठी प्रत्येक परीक्षा केंद्राच्या 100 मीटर परिसरात विशेष निर्बंध लागू करण्यात आले आहेत.

आदेशानुसार परीक्षा केंद्र परिसरात कोणत्याही प्रकारच्या घोषणा देण्यास मनाई राहील.शांततेस बाधा निर्माण करणारे कोणतेही कृत्य करता येणार नाही.परीक्षा केंद्रांच्या 100 मीटर परिसरातील झेरॉक्स सेंटर,टायपिंग सेंटर,एसटीडी बूथ, इंटरनेट कॅफे,संगणक केंद्रे, ध्वनिक्षेपक तसेच तत्सम सुविधा बंद ठेवाव्या लागणार आहेत.तसेच मोबाईल फोन,सेल्युलर फोन,फॅक्स, ई-मेल अथवा इतर प्रसारमाध्यमांच्या साधनांसह परीक्षा केंद्रात प्रवेश करण्यास मनाई करण्यात आली आहे.कोणत्याही व्यक्तीकडून परीक्षा सुरळीत व शांततेच्या वातावरणात पार पडण्यास बाधा निर्माण होईल असे वर्तन करता येणार नाही.परीक्षा केंद्र परिसरात वाहन प्रवेशासही बंदी राहणार आहे.

परीक्षेशी संबंध नसलेल्या कोणत्याही व्यक्तीस परीक्षा केंद्रात प्रवेश दिला जाणार नाही.केवळ परीक्षा केंद्रावर नियुक्त अधिकारी व कर्मचारी, शासकीय कामावरील अधिकारी- कर्मचारी,संबंधित शाळेचे मुख्याध्यापक,शिक्षक,कर्मचारी आणि परीक्षार्थी यांनाच प्रवेश राहील.परीक्षार्थ्यांच्या नातेवाईकांनाही केंद्र परिसरात प्रवेश दिला जाणार नसल्याचे आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे. याशिवाय परीक्षा केंद्रांच्या 100 मीटर परिसरात पाच किंवा त्यापेक्षा अधिक व्यक्तींना एकत्र येण्यास मनाई करण्यात आली आहे.परीक्षा केंद्रात परीक्षेशी संबंधित अधिकारी, कर्मचारी आणि परीक्षार्थी यांच्याशिवाय इतर कोणालाही प्रवेश दिला जाणार नाही.मात्र,परीक्षा केंद्रांवर कर्तव्य बजावणारे अधिकारी,कर्मचारी,पोलीस अधिकारी व कर्मचारी तसेच निगराणी पथकांवर हे निर्बंध लागू राहणार नाहीत.

आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम 223 अन्वये गुन्हा नोंदवून फौजदारी कारवाई करण्यात येणार असल्याचा इशाराही प्रशासनाने दिला आहे.हा आदेश अपर जिल्हादंडाधिकारी, धाराशिव यांनी दि.16 जून 2026 रोजी जारी केला आहे.

 
Top