तुळजापूर (प्रतिनिधी)- श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानने गुरुवार, दि. 18 जूनपासून सशुल्क दर्शन आणि धर्मदर्शन रांगेतून येणाऱ्या भाविकांना एकाच रांगेतून दर्शन देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय प्रत्यक्षात अमलात आणला आहे. गुरुवार दिनांक 18 जून रोजी 25 हजार 632 या दर्शनाचा लाभ घेतला.
दर्शन व्यवस्थेत सुधारणा करण्यात आली असली तरी गाभाऱ्यात ठेकेदाराचे मंडळी आडवे उभे राहत असल्याने भाविकांना देवीचे सुलभ दर्शन घेणे अवघड जात आहे अशा तक्रारी भाविकातून येत आहेत. तरी या लोकांना बाजूला उभे राहण्यासाठी मंदिर समितीने आदेश देण्याची मागणी होत आहे. सध्या भाविकांची संख्या तुलनेने कमी असल्यामुळे मंदिर प्रशासन आणि सुरक्षा व्यवस्थेवर विशेष ताण जाणवत नसला, तरी आगामी यात्रा, सुट्ट्या आणि गर्दीच्या काळात ही व्यवस्था कितपत प्रभावी ठरते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. सर्व भाविकांना देवीचे दर्शन समान अंतरावरून आणि अधिक सुलभ पद्धतीने घेता यावे, या उद्देशाने दर्शन व्यवस्थेत बदल करण्यात आला आहे. असा दावा मंदिर प्रशासनाने केला आहे.

