धाराशिव (प्रतिनिधी)- मराठवाडा साहित्य परिषद शाखा धाराशिव च्या वतीने येथील सुप्रसिद्ध कवी व सहशिक्षक श्याम नवले यांच्या आवर्तनाच्या आतबाहेर या काव्यसंग्रहाचा आज सोमवार दिनांक २५ मे २०२६ रोजी सकाळी १०:३० वाजता धाराशिव येथील जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय सभागृह,डॉ.आंबेडकर पुतळ्याजवळ भोगावती नदी पुलाच्या बाजूला प्रकाशन सोहळा संपन्न होणार आहे.
या प्रकाशन सोहळ्यास प्रमुख अतिथी म्हणून सुप्रसिद्ध कवी डॉ. पी.विठ्ठल तसेच महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे च्या माजी कार्यवाह सुनिताराजे पवार यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान मराठवाडा साहित्य परिषद शाखा धाराशिव चे अध्यक्ष नितीन तावडे भूषविणार आहेत. कवी श्याम नवले यांच्या आई लतिका नवले व वडील बबन नवले यांच्या शुभहस्ते या काव्यसंग्रहाचे प्रकाशन होणार आहे.
समकालीन माणसाच्या मानसिक व सामाजिक जाणीव याचे प्रखर दर्शन घडविणाऱ्या श्याम नवले यांच्या स्वरचित १०१ कविता या काव्यसंग्रहात समाविष्ट आहेत. संस्कृती प्रकाशन पुणे यांनी हा काव्यसंग्रह प्रकाशित केला आहे. तरी या काव्यसंग्रहाच्या प्रकाशन सोहळ्यास साहित्यिक, रसिक,वाचक व नागरिक यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन मराठवाडा साहित्य परिषद शाखा धाराशिव च्या वतीने करण्यात येत आहे.