धाराशिव (प्रतिनिधी)-  वर्षानुवर्षे प्रलंबित असलेल्या प्रकरणांमध्ये अडकलेल्या नागरिकांसाठी दिलासादायक बातमी समोर आली असून भारताच्या सर्वोच्च न्यायालयाच्या पुढाकारातून ‌‘समाधान समारोह-2026‌’ या विशेष मोहिमेची घोषणा करण्यात आली आहे.या उपक्रमांतर्गत 21,22 व 23 ऑगस्ट रोजी नवी दिल्ली येथील उच्च न्यायालयात विशेष लोक अदालतीचे आयोजन करण्यात येणार आहे.

जिल्ह्यातील ज्या पक्षकारांची प्रकरणे सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहेत, त्यांच्यासाठी ही एक सुवर्णसंधी ठरणार आहे. आपसी तडजोडीद्वारे प्रकरणे निकाली काढण्यासाठी इच्छुकांनी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाशी संपर्क साधावा,असे आवाहन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या अध्यक्षा अभिश्री देव व सचिव भाग्यश्री  पाटील यांनी केले आहे. या ‌‘समाधान समारोह-2026‌’ उपक्रमाचे अनेक फायदे आहेत. वर्षानुवर्षे चालणाऱ्या खटल्यांचा निकाल दोन्ही बाजूंच्या संमतीने काही तासांत लागू शकतो, त्यामुळे वेळेची मोठी बचत होते.तसेच लोक अदालतीमध्ये प्रकरण निकाली निघाल्यास कोर्ट फी परत मिळण्याची तरतूद असून वकिलांच्या दीर्घकालीन खर्चातूनही सुटका होते. या प्रक्रियेत हार-जीत यापेक्षा सामोपचाराने तोडगा काढण्यावर भर दिला जातो,ज्यामुळे दोन्ही पक्षांमधील संबंध सुधारण्यास मदत होते.

या उपक्रमाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे नागरिकांना घरबसल्या सहभागाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.इच्छुकांना जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, उस्मानाबाद येथे प्रत्यक्ष उपस्थित राहून किंवा ऑनलाईन पद्धतीनेही या प्रक्रियेत सहभागी होता येणार आहे. यासाठी दिल्लीला जाण्याची आवश्यकता नसणार आहे. 

 
Top