तुळजापूर (प्रतिनिधी)- तीर्थक्षेत्र तुळजापूर शहरासह परिसरात वाढत्या तापमानामुळे पाणीपातळीत मोठी घट झाली असून शहरातील अनेक खासगी बोअरवेल कोरड्या पडल्या आहेत. विशेष म्हणजे श्री तुळजाभवानी मंदिरातील पवित्र श्री गोमुख व श्री कल्लोळ तीर्थकुंडातून येणाऱ्या पाण्याचा ओघही कमी झाला आहे. त्यामुळे आगामी काळात तुळजापूरमध्ये पाणीटंचाईची शक्यता निर्माण झाली सध्या भाविक लाखोंच्या संख्येने येत असल्याने भाविकांच्या सोयीसाठी भाविकांच्या वर्दळ असणाऱ्या जुन्या तुळजापुरात नगरपरिषदेकडून अधिक वेळ पाणीपुरवठा करावा, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
तुळजापूर तालुक्यात 2025 मध्ये विक्रमी पाऊस झाला होता. सरासरीपेक्षा अधिक म्हणजे सुमारे 1000 मिमी पर्जन्यवृष्टी झाल्याने यंदा उन्हाळ्यात पाणीटंचाई जाणवणार नाही, अशी अपेक्षा होती. त्यामुळे जमिनीतील पाण्याची पातळी वाढून श्री तुळजाभवानी मंदिरातील श्रीगोमुख तीर्थकुंडातून सतत पाण्याची धार वाहत होती, तसेच श्रीकल्लोळ तीर्थकुंडातील 108 झरेही खळखळून वाहत होते. मात्र, नियोजनाअभावी झालेला बेसुमार पाण्याचा उपसा आणि बेफिकीर वापर यामुळे भूजलपातळी पुन्हा खोलवर गेली. त्याचा परिणाम आता शहरातील बोअरवेल्सवर दिसून येत असून पवित्र तीर्थकुंडातील पाणीही आटू लागले आहे.
सध्या मंदिरातील श्रीकल्लोळ व श्रीगोमुख कुंडात स्नानासाठी भाविकांची मोठी गर्दी होत आहे. त्यामुळे उपलब्ध पाण्यावर अधिक ताण पडत आहे. नागरिकांनी पाण्याचा काटकसरीने वापर करणे गरजेचे असून, पावसाळा लवकर सुरू झाला नाही, तर परिस्थिती आणखी गंभीर होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
