धाराशिव (प्रतिनिधी)- धाराशिव शहरातील मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीत महाराष्ट्र दिनी, 1 मे रोजी आत्मदहनाचा प्रयत्न करणाऱ्या महिलेचा उपचारादरम्यान दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे संपूर्ण जिल्ह्यात हळहळ व्यक्त केली जात असून प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
महाराष्ट्र दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात ध्वजारोहणाचा कार्यक्रम सुरू असताना संबंधित महिलेने अंगावर पेट्रोल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला होता. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे परिसरात एकच खळबळ उडाली होती. उपस्थित पोलिस कर्मचारी व प्रशासनातील अधिकाऱ्यांनी तातडीने धाव घेत आग विझवली आणि महिलेला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले होते.
या घटनेत महिला सुमारे 70 टक्के भाजल्या होत्या. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र, प्रकृती गंभीर असल्याने उपचारादरम्यान त्यांची मृत्यूशी सुरू असलेली झुंज अखेर अपयशी ठरली. त्यांच्या निधनाची बातमी समोर येताच विविध स्तरांतून शोक व्यक्त करण्यात येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मृत महिला भूविकास बँकेत कर्मचारी म्हणून कार्यरत होत्या. बँकेवर प्रशासक नियुक्त करण्यात आल्यानंतर कर्मचाऱ्यांच्या नोकरीसह थकीत वेतनाचा प्रश्न निर्माण झाला होता. “आम्हाला बँकिंग क्षेत्रात समाविष्ट करा तसेच प्रलंबित वेतन तातडीने द्या,” अशी मागणी त्यांनी प्रशासनाकडे केली होती. यासंदर्भात त्यांनी अनेक वेळा निवेदने देऊन पाठपुरावा केल्याची माहिती समोर आली आहे.
मात्र, त्यांच्या मागण्यांवर योग्य वेळी निर्णय न झाल्याने त्या मानसिक तणावाखाली असल्याचे सांगितले जात आहे. आत्मदहन करण्यापूर्वीही त्यांनी प्रशासनाला इशारा दिला होता, अशी चर्चा आता रंगू लागली आहे. त्यामुळे प्रशासनाने या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेतली होती का, असा सवाल उपस्थित होत आहे.
या घटनेनंतर कर्मचारी संघटनांसह विविध सामाजिक संघटनांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. संबंधित प्रकरणाची सखोल चौकशी करून जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, तसेच भूविकास बँकेतील कर्मचाऱ्यांचे प्रश्न तातडीने सोडवावेत, अशी मागणी जोर धरू लागली आहे.
