धाराशिव (प्रतिनिधी)- भारतीय जनता पार्टी किसान मोर्चाचे महाराष्ट्र प्रदेश सचिव तथा धाराशिव जिल्हा परिषदेचे माजी सदस्य रामदास कोळगे यांनी आपणास धाराशिव लातूर बीड स्थानिक स्वराज्य संस्था मतदार संघातून विधान परिषदेवर संधी द्यावी अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्याकडे केली आहे.
येत्या 18 जून रोजी राज्यातील 17 जागासाठी स्थानिक स्वराज्य संघाची निवडणुक होत आहे. या निवडणुकीसाठी आपणास संधी द्यावी अशी मागणी त्यांनी केली आहे. पक्षश्रेष्ठीना पाठवलेल्या निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, लहानपणापासून आपण राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या संस्कारातून घडत, 1982-83 पासून संघकार्याची सुरुवात केली आणि 1990 सालापासून भारतीय जनता पार्टीच्या कार्यात सक्रिय सहभाग नोंदवला. या प्रदीर्घ प्रवासात पक्षाने विविध जबाबदाऱ्या देत घडवले. अगदी शाखा सरचिटणीस (रुईभर), तालुका सरचिटणीस व अध्यक्ष (धाराशिव), जिल्हाध्यक्ष (भाजपा युवा मोर्चा), प्रदेश कार्यकारिणी सदस्य, जिल्हा उपाध्यक्ष व सरचिटणीस (भाजपा), तसेच किसान मोर्चामध्ये मराठवाडा एफपीओ प्रमुख व प्रदेश सचिव अशी अनेक पदे सांभाळण्याची संधी मिळाली.
सामाजिक व लोकप्रतिनिधी म्हणूनही कार्य करताना पंचायत समिती सदस्य म्हणून सलग तीन वेळा (19972012), उपसभापती (20022004), तसेच जिल्हा परिषद सदस्य (20122017) म्हणून जनतेची सेवा करण्याचा प्रयत्न केला. यासोबतच विविध सहकारी व कृषी संस्थांमध्ये जबाबदाऱ्या पार पाडत ग्रामीण विकास, शेतकरी सक्षमीकरण आणि संघटन बळकटीकरणासाठी सातत्याने कार्यरत राहिलो आहे.या सर्व कार्यकाळात आपण पक्षाच्या विचारधारेप्रती निष्ठा, प्रामाणिकपणा आणि जनतेप्रती बांधिलकी जपण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आहे. आजपर्यंत दिलेल्या प्रत्येक संधीचे सोने करत पक्षवृद्धी आणि जनसेवा हेच ध्येय ठेवले आहे. माझा दीर्घकालीन अनुभव, संघटनात्मक बांधिलकी आणि जनतेशी असलेला थेट संपर्क लक्षात घेऊन धाराशिव लातूर बीड स्थानिक स्वराज्य संस्था मतदार संघातुन महाराष्ट्र विधान परिषदेचे सदस्य म्हणून कार्य करण्याची संधी आपणास मिळावी, अशी मागणी श्री. कोळगे यांनी केली आहे.
