धाराशिव (प्रतिनिधी)- शहरातील विजय चौक-दर्गा रोड परिसरात मागील 11 ते 12 दिवसांपासून नियमित पाणीपुरवठा न झाल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे. पिण्याच्या पाण्यासाठी महिला, ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुलांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असून शहरातील पाणीटंचाईचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर बनत चालल्याची भावना नागरिक व्यक्त करत आहेत.
या पार्श्वभूमीवर शिवसेना लोकसभा सहसंपर्कप्रमुख सुरज साळुंके यांनी थेट नगरपालिका कार्यालयात धडक देत शहरातील विस्कळीत पाणीपुरवठ्याबाबत विविध तक्रारी मांडल्या. प्रशासनाने लवकरात लवकर पर्यायी उपाययोजना करून नियमित पाणीपुरवठा सुरळीत करावा, अशी मागणी त्यांनी यावेळी केली. यावेळी बोलताना सुरज साळुंके यांनी शहरातील सध्याच्या पाणीस्थितीबाबत चिंता व्यक्त करताना म्हटले की, आम्ही नगरसेवक आणि पाणी पुरवठा सभापती असताना दुष्काळी परिस्थितीत तसेच प्रशासनाच्या काळातही शहराला चार दिवसांतून एकदा सुरळीत पाणीपुरवठा होत होता. दरवर्षी वीजपुरवठ्याचा लपंडाव, पाइपलाइन फुटी यांसारख्या समस्या उद्भवत असतानाही इतकी बिकट परिस्थिती कधी निर्माण झाली नव्हती. मात्र सध्या शहरातील अनेक भागांना दहा ते बारा दिवसांनी कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्याने नागरिकांचे हाल होत आहेत.
शहरातील वाढत्या पाणीटंचाईच्या प्रश्नावर सत्ताधारी आणि विरोधक या दोघांनीही ठोस भूमिका घेतली नसल्याने नागरिकांमध्ये प्रश्नचिन्ह निर्माण होत असल्याचेही त्यांनी नमूद केले. शहरातील जनतेच्या प्रश्नांवर आवाज उठवणे आवश्यक असून पाणीप्रश्नाकडे गांभीर्याने पाहिले गेले पाहिजे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. काही भागांमध्ये स्थानिक पातळीवरील मनमानी कारभारामुळे पाणीपुरवठ्याचे रोटेशन विस्कळीत झाल्याचेही त्यांनी अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिले.
एका नगरसेवकाच्या घरातील लग्नकार्यामुळे रोटेशन पद्धती मोडून विशिष्ट भागात पाणी सोडण्यात आले होत, त्यामुळे इतर भागातील पाणीपुरवठ्यावर परिणाम झाल्याचा आरोपही यावेळी करण्यात आला.संबंधित प्रकरणाची चौकशी करून जबाबदार कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी तसेच भविष्यात अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी प्रशासनाने खबरदारी घ्यावी, अशी मागणीही सुरज साळुंके यांनी केली. तसेच शहरातील पाणीपुरवठा तातडीने सुरळीत न झाल्यास शिवसेना शैलीत तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला. दरम्यान, विजय चौक-दर्गा रोड परिसरातील नागरिकांनीही पाणीप्रश्न तातडीने सोडवावा, अशी मागणी करत आहेत.
