धाराशिव (प्रतिनिधी)- तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालय अंतर्गत कार्यरत फार्मसी विभागाने यंदाही प्लेसमेंटच्या क्षेत्रात उल्लेखनीय यश संपादन करत आणखी एक विक्रम आपल्या नावावर केला आहे. महाविद्यालयातील अंतिम वर्षातील तब्बल 27 विद्यार्थ्यांची भरत सिरम, एमक्यूर फार्मास्युटिकल आणि निप्रो फार्मा यांसारख्या नामांकित औषधनिर्माण कंपन्यांमध्ये निवड झाली आहे.

धाराशिव येथील तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालय रोजगारनिर्मितीसाठी ओळखले जाते. दरवर्षी 70 ते 80 टक्के विद्यार्थ्यांना प्लेसमेंटची संधी मिळत असून, यावर्षीदेखील ही परंपरा कायम ठेवण्यात महाविद्यालयाला यश आले आहे. फार्मसी विभागात दोन टप्प्यांत प्लेसमेंट प्रक्रिया राबविण्यात आली. पहिल्या टप्प्यात तब्बल 45 विद्यार्थ्यांची पुण्यातील नामांकित फार्मास्युटिकल कंपनीत निवड झाली होती, तर दुसऱ्या टप्प्यात 27 विद्यार्थ्यांनी मोठ्या कंपन्यांमध्ये स्थान मिळवले.

महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विक्रमसिंह माने यांनी सांगितले की, विद्यार्थ्यांना विद्यापीठीन शिक्षणासोबत उद्योगांना अपेक्षित असलेली कौशल्ये दिली जात आहेत. त्यामुळे तांत्रिकदृष्ट्या सक्षम विद्यार्थ्यांची निवड करण्यासाठी अनेक नामांकित कंपन्या महाविद्यालयाशी संपर्क साधत आहेत. येत्या काही महिन्यांत आणखी दहाहून अधिक फार्मसी कंपन्यांचे प्लेसमेंट प्रस्ताव प्राप्त झाले असून अधिक विद्यार्थ्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला. या भरती प्रक्रियेत तांत्रिक कौशल्य, संवादकौशल्य आणि आत्मविश्वास या गुणांना विशेष महत्त्व देण्यात आले. विद्यार्थ्यांनी सातत्यपूर्ण तयारीच्या जोरावर मुलाखतीच्या सर्व फेऱ्यांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करत यश संपादन केले. निवड झालेल्या विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण असून पालकांनीही समाधान व्यक्त केले आहे.

निवड झालेल्या विद्यार्थ्यांमध्ये भारत सिरम मध्ये आकांशा कुलकर्णी, ओंकार गंजे, अंकिता शिरसागर, ऋतुजा महामुनी, निप्रो फार्मा मध्ये श्रेया पाटील, प्रणिता लाकाळ, प्रथमेश खडके, सुरज हासुरे, अनिकेत साबळे, प्रद्युम्न शेटे, श्रीकृष्ण हंगे, सुमित चोपडे, अक्षय शेळके, सायली साळुंखे, ऐश्वर्या शेरकर, वैभव गुंजाळ, सायली खोपडे,   एमक्यूआर मध्ये नरेंद्र मंडवाल,अथर्व कडू, ओंकार गंजे, अजित लांडगे, अविष्कार हाके, श्रेयश गवळी, प्रतिक लोहेकर, रितेश  लिमये, अमर मोहिते यांच्यासह इतर महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनाही संधी देण्यात आली यामध्ये सरोजा अष्टेकर आणि ऋतुजा महामुनी या विद्यार्थिनींचा समावेश आहे.

हा प्लेसमेंट ड्राइव्ह यशस्वी करण्यासाठी ऍडविट सर्विसेसचे संतोष स्वामी, तसेच नामांकित कंपनी एमक्युअर एच आर विकास चव्हाण, भारत सिरम कलूर बोस, निप्रो फार्मा जाधव साखरे यांचे विशेष सहकार्य लाभले. तसेच ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर अशोक जगताप, फार्मसी विभागाचे प्लेसमेंट ऑफिसर डॉ. जी. बी. चिवटे आणि मुंढे यांनी विशेष परिश्रम घेतले.

या यशाबद्दल तेरणा ट्रस्टचे अध्यक्ष तथा माजी गृहमंत्री पद्मसिंह पाटील, उपाध्यक्ष तथा आमदार राणाजगजितसिंह पाटील, कार्यकारी विश्वस्त मल्हार पाटील, विश्वस्त बाळासाहेब वाघ, व्यवस्थापकीय समन्वयक गणेश भातलवंडे, विभागप्रमुख, प्राध्यापक, कर्मचारी व विद्यार्थ्यांनी निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. भविष्यातही अशाच उपक्रमांद्वारे विद्यार्थ्यांना अधिकाधिक रोजगारसंधी उपलब्ध करून देण्याचा मानस व्यक्त करण्यात आला.


 
Top