उमरगा (प्रतिनिधी)- येथील उपजिल्हा रुग्णालयात हर्नियाच्या आजारावर शस्त्रक्रिया करतांना विवाहित महिलेचा मृत्यू झाल्यानें संतप्त झालेल्या नातेवाईकांनी रुग्णालयात आक्रोश केला. संबंधित डॉक्टरांवर कारवाई करण्यात यावी, यासाठी नातेवाईकांनी बुधवारी उपजिल्हा रुग्णालयात तर गुरुवारी पोलिस ठाण्यात ठिय्या मांडला.
शहरातील महात्मा फुले नगर येथे राहणारी महिला मैना रविराज सलके वय 35 वर्षे या महिलेला हर्नियाचा आजार झाल्याने तिला मंगळवारी (दि 19) शहरातील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. बुधवारी (20) तिला ऑफरेशन करण्यासाठी नेण्यात आले. सायंकाळी बऱ्याच वेळा नंतर सदर महिला होशमध्ये येईल असे सांगण्यात आले. मात्र महिलेची कोणतीही हालचाल होत नसल्याचे पाहून नातेवाईकांनी हंबरडा फोडला. त्यानंतर रुग्णालयात गर्दी झाली. रात्री उशिरापर्यंत संबंधित डॉक्टरवर गुन्हा दाखल करण्यात यावा म्हणून नातेवाईकांनी मागणी करत दवाखान्यात ठिय्या मांडला. त्यानंतर रात्री उशिरापर्यंत कोणताही तोडगा निघाला नसल्याने गुरुवारी सकाळी दहा वाजल्यापासून संतप्त महिलां पुरुषांनी पोलीस ठाण्यात गर्दी केली. दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिस निरीक्षक प्रल्हाद सूर्यवंशी यांनी मयताच्या शवविच्छेदन अहवालात जी माहिती समोर येईल त्यानुसार संबंधित आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्याचे सांगितले. यावेळी कोळी महासंघाचे तालुकाध्यक्ष रमेश जोगे, ओम जमादार, शंकर जमादार आदीसह महिलांनी पोलीस ठाण्यात ठिय्या मांडला होता.
