तुळजापूर (प्रतिनिधी)- उस्मानाबाद-लातूर-बीड स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीची चाहूल लागताच भाजपमध्ये इच्छुकांची संख्या वाढू लागली आहे. या पार्श्वभूमीवर माजी मंत्री मधुकरराव चव्हाण यांचे सुपुत्र तथा सहकार क्षेत्रातील प्रभावी चेहरा म्हणून ओळख असलेले सुनील मधुकरराव चव्हाण यांनीही निवडणुकीसाठी जोरदार तयारी सुरू केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे.

लातूर, बीड आणि धाराशिव या तिन्ही जिल्ह्यांत भाजपचे नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांमधील लोकप्रतिनिधींची संख्या लक्षणीय आहे. त्यामुळे भाजप या निवडणुकीकडे प्रतिष्ठेची लढत म्हणून पाहत असून उमेदवारीसाठी पक्षांतर्गत लॉबिंगला वेग आल्याचे बोलले जात आहे. मागील विधान परिषद स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत भाजपचे उमेदवार सुरेश धस यांना निवडून आणण्यात सुनील चव्हाण यांनी महत्त्वाची भूमिका बजावल्याची चर्चा कार्यकर्त्यांमध्ये आहे. तसेच ऐन लोकसभा निवडणुकीत भाजपमध्ये प्रवेश करून त्यांनी पक्षाच्या प्रचारात सक्रिय सहभाग नोंदविला होता. 2024 च्या विधानसभा निवडणुकीत आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या प्रचारातही त्यांनी पुढाकार घेतला होता. नगरपालिका, जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांमध्ये भाजप उमेदवारांना निवडून आणण्यासाठी त्यांनी कार्यकर्त्यांसोबत खांद्याला खांदा लावून काम केल्याचे पक्षातील पदाधिकाऱ्यांकडून सांगितले जात आहे.

माजी मंत्री मधुकरराव चव्हाण यांचे जिल्हाभर असलेले मजबूत कार्यकर्त्यांचे जाळे आणि सहकार क्षेत्रातील प्रभाव भाजपसाठी फायद्याचा ठरू शकतो, अशीही चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. अणदूर येथील रहिवासी असलेले सुनील चव्हाण यांनी सहकार क्षेत्रात दीर्घकाळ काम केले आहे. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक तसेच श्री तुळजाभवानी शेतकरी सहकारी साखर कारखाना, नळदुर्ग येथे त्यांनी संचालक व अध्यक्ष म्हणून जबाबदारी सांभाळली आहे. त्यामुळे सहकार आणि स्थानिक राजकारणातील त्यांचा संपर्क मजबूत मानला जातो. धाराशिव जिल्ह्यातून  सुनील चव्हाण यांच्या नावाचीही जोरदार चर्चा सुरू झाली आहे. केंद्र, राज्य तसेच जिल्हा परिषद आणि अनेक नगरपालिकांमध्ये भाजपची सत्ता असल्याने पक्ष नेतृत्व कोणत्या चेहऱ्यावर विश्वास दाखवते, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

 
Top