भूम (प्रतिनिधी) - मार्च अखेरीस मंजूर झालेल्या सहा प्रस्तावांपैकी केवळ दोन प्रस्ताव ऑनलाइन प्रणालीत दिसत असून चार प्रस्ताव तांत्रिक गोंधळामुळे गायब झाले आहेत. परिणामी, मंजुरी मिळूनही संबंधित लाभार्थी कुटुंबांना आर्थिक मदतीपासून वंचित राहावे लागत आहे. आर्थिक वर्ष संपल्यामुळे निधीअभावी परिस्थिती अधिकच बिकट झाली आहे. त्यामुळे भूम तहसीलमध्ये राष्ट्रीय कुटुंब अर्थसहाय्य योजनेत अनियमितता दिसून असल्याने काँग्रेस पक्षाच्यावतीने निषेध करण्यात आला आहे.
आधीच कुटुंबातील कमावता सदस्य गमावलेल्या या कुटुंबांवर उपासमारीची वेळ आली असून प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे त्यांचा हक्काचा आधार हिरावला गेला आहे. काँग्रेस पक्षाने प्रशासनाकडे तात्काळ तांत्रिक त्रुटी दूर करून प्रलंबित लाभार्थ्यांना निधी वितरित करण्याची मागणी केली आहे. अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा भूम परंडा वाशी युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष मोईज सय्यद शेखापुरकर यांच्या वतीने देण्यात आला आहे.
यावेळी धाराशिव जिल्हा काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष विलास शाळू, तालुकाध्यक्ष रुपेश शेंडगे, धाराशिव एन.एस.यु.आय.चे जिल्हाध्यक्ष ॲड. मुशरफ सय्यद भूम नगर परिषदेचे माजी नगरसेवक सोपान वरुडे ॲड. सोहेल शेख, उमेश ढगे रमेश पवार अमोल वाघमारे यासह कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.
