धाराशिव, (प्रतिनिधी)- अखिल भारतीय औषधी विक्रेता संघटना व महाराष्ट्र स्टेट केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशन यांच्या आवाहनानुसार आज धाराशिव जिल्ह्यात ऑनलाईन औषध विक्री, अनियंत्रित ई-फार्मसी, बेकायदेशीर सवलत पद्धती तसेच औषध व्यवसायासमोरील वाढत्या गंभीर प्रश्नांच्या निषेधार्थ आयोजित करण्यात आलेला औषध विक्रेत्यांचा बंद उत्स्फूर्त प्रतिसादात 100% यशस्वी झाला.
धाराशिव शहरासह जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमधील औषध विक्रेत्यांनी आपापली औषध दुकाने पूर्णतः बंद ठेवून आंदोलनाला भक्कम पाठिंबा दर्शविला. रुग्णसेवेचा विचार करून अत्यावश्यक परिस्थितीसाठी काही निवडक मेडिकल स्टोअर्स सुरू ठेवण्यात आले होते. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज चौक ते जिल्हाधिकारी कार्यालय असा शांततापूर्ण मूक मोर्चा काढण्यात आला. मोर्चानंतर जिल्हाधिकारी महोदयांना निवेदन देऊन औषध व्यवसाय व सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेसमोरील गंभीर समस्या शासनापर्यंत पोहोचविण्यात आल्या. संघटनेच्या वतीने सांगण्यात आले की, अनियंत्रित ऑनलाईन औषध विक्रीमुळे बनावट औषधांचा धोका, डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनशिवाय औषध विक्री, रुग्णांच्या आरोग्याशी होणारी तडजोड तसेच पारंपरिक व कायदेशीर औषध वितरण व्यवस्थेवर मोठा परिणाम होत आहे. औषध हे सामान्य वस्तू नसून ते प्रशिक्षित फार्मासिस्टच्या मार्गदर्शनाखालीच सुरक्षितरीत्या उपलब्ध होणे आवश्यक आहे. त्यामुळे ई-फार्मसी व अनियंत्रित डिस्काउंट पद्धतीवर कठोर नियंत्रण आणण्याची मागणी यावेळी करण्यात आली.
याचबरोबर जिल्ह्यातील प्रत्येक तालुका स्तरावरही संबंधित तालुका केमिस्ट असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी तहसीलदार यांना निवेदन देऊन ऑनलाईन फार्मसी, अनियंत्रित डिस्काउंट पद्धती व औषध व्यवसायासमोरील गंभीर समस्यांकडे शासनाचे लक्ष वेधले. या आंदोलनात जिल्हाध्यक्ष श्री. धनाजी आनंदे, सचिव श्री. किरण हंगरगेकर, कोषाध्यक्ष श्री. कुणाल गांधी, धाराशिव तालुका अध्यक्ष श्री. रोहित फिसरेकर, शहर अध्यक्ष श्री. विशाल हिंगमिरे, श्री. दिनेश वाबळे तसेच जिल्हा, तालुका व शहर कार्यकारिणीचे पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने औषध विक्रेते सहभागी झाले होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी धाराशिव तालुका व शहर कार्यकारिणीने प्रयत्न घेतले..