तुळजापूर (प्रतिनिधी)- महाराष्ट्राची कुलस्वामिनी असलेल्या श्री तुळजाभवानी मंदिर नगरीची ओळख पवित्र धार्मिक तीर्थक्षेत्र म्हणून असली तरी सध्या शहरातील वाढत्या कथित जुगार अड्ड्यांमुळे तुळजापूर पुन्हा चर्चेत आले आहे. शहर व परिसरात सुरू असलेल्या कथित जुगार अड्ड्यांवर तातडीने कारवाई करून ते बंद करण्याची मागणी नागरिक व सामाजिक कार्यकर्त्यांकडून जोर धरत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, तुळजापूरमध्ये राज्यासह परराज्यातील काही धनाढ्य व्यक्ती कथित जुगार खेळण्यासाठी येत असल्याची चर्चा आहे. धार्मिक स्थळ असल्यामुळे आणि तुलनेने सुरक्षित वातावरण असल्याची समजूत असल्याने काही जण तुळजापूरकडे जुगारासाठी आकर्षित होत असल्याचे बोलले जात आहे. या कथित अड्ड्यांमधून कोट्यवधी रुपयांची उलाढाल होत असल्याचीही चर्चा रंगत आहे. एकेकाळी केवळ दर्शनासाठी प्रसिद्ध असलेले तुळजापूर आता ड्रग्जनंतर जुगाराच्या मुद्द्यावरून बदनाम होत असल्याची खंत नागरिक व्यक्त करत आहेत. पवित्र धार्मिक वातावरणाला बाधा आणणाऱ्या या प्रकारांना नेमका कोणाचा वरदहस्त आहे का, अशीही चर्चा शहरात सुरू आहे. या प्रकारामागे कोणते राजकीय संरक्षण आहे का, याची सखोल चौकशी करून सत्य बाहेर आणण्याची मागणी होत आहे.

विशेष म्हणजे काही जण देवदर्शनाच्या नावाखाली शहरात येतात आणि कथित जुगार अड्ड्यांवर वेळ घालवत असल्याची माहिती समोर येत आहे. शहरातील निसर्गरम्य व सर्व सोयींनी युक्त काही ठिकाणांचा गैरवापर होत असल्याचेही बोलले जात आहे. याचा सर्वाधिक परिणाम शहरातील युवा पिढीवर होत असल्याची चिंता व्यक्त केली जात आहे. तरुण वर्ग जुगाराच्या व्यसनाकडे वळत असल्याने अनेक कुटुंबांचे संसार उद्ध्वस्त होण्याची भीती व्यक्त होत आहे. 

 
Top