काटी (प्रतिनिधी)- तुळजापूर तालुक्यातील दहिवडी येथील रहिवासी आणि मुंबई उच्च न्यायालयाच्या छत्रपती संभाजीनगर खंडपीठातील प्रसिद्ध वकील ॲड. गणेश विलास पाटील (वय 40) यांचे गुरुवार, 21 मे रोजी रात्री पुण्यात उपचारादरम्यान अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर शुक्रवारी दुपारी 12:05 वाजता दहिवडी येथील त्यांच्या शेतात नातेवाईक ,मित्र परिवार,विधीज्ञ,ग्रामस्थांच्या उपस्थितीत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी अनेक मान्यवरांनी शोक व्यक्त करत श्रध्दांजली वाहिली.

ॲड. गणेश पाटील (दहिवडीकर) हे गेल्या अनेक वर्षांपासून छत्रपती संभाजीनगर खंडपीठात वकिली व्यवसाय करत होते. आपल्या कायदेविषयक कौशल्यामुळे त्यांनी वकील क्षेत्रात अल्पवयातच नाव कमावले होते. काही दिवसांपूर्वी प्रकृती खालावल्यामुळे त्यांना पुढील उपचारासाठी पुणे येथील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचार सुरू असतानाच गुरुवारी रात्री त्यांची प्राणज्योत मालवली.

ॲड. पाटील हे दहिवडी येथील प्रगतशील शेतकरी विलास पाटील यांचे चिरंजीव, तर डॉ. राजेश पाटील यांचे थोरले बंधू होते. त्यांच्या अकाली जाण्याने पाटील कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून, दहिवडीसह संपूर्ण तुळजापूर परिसरात आणि वकील वर्तुळात तीव्र हळहळ व्यक्त केली जात आहे. त्यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, एक मुलगी, भाऊ, बहीण, चुलते, चुलत भाऊ आणि भावजय असा मोठा परिवार आहे.

 
Top