कळंब (प्रतिनिधी)- महाराष्ट्र दिनानिमित्त कळंब आगारात सुरक्षित व अपघातमुक्त सेवा बजावणाऱ्या चालकांचा विशेष सन्मान करण्यात आला. आगारप्रमुख विजयकुमार घोलप यांच्या हस्ते चालकांना सुरक्षित सेवेचे बॅच-बिल्ले व सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले.

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या धाराशिव विभागाकडून अपघातविरहित व जबाबदारीने सेवा बजावणाऱ्या चालकांची निवड करण्यात आली होती. अनेक वर्षे प्रवाशांची सुरक्षित वाहतूक करत उत्कृष्ट सेवा देणाऱ्या चालकांच्या कार्याची दखल घेत हा सन्मान प्रदान करण्यात आला.

यामध्ये चालक ज्ञानदेव तुकाराम कासार यांना 20 वर्षे सुरक्षित सेवा, मच्छिंद्र अर्जुन डोके, नरसिंग भास्कर आडसुळ , बाबासाहेब महादेव धावारे व बाळासाहेब बाबुराव कवडे यांना प्रत्येकी 15 वर्षे सुरक्षित सेवा, तर पुरुषोत्तम वासुदेव लोकरे , जनक विश्वनाथ आरकडे, रंजित रतन गायकवाड आणि महादेव पांडुरंग नागरगोजे यांना 10 वर्षे सुरक्षित सेवा पूर्ण केल्याबद्दल गौरविण्यात आले. यावेळी आगारप्रमुख विजयकुमार घोलप यांनी चालकांचे अभिनंदन करताना, “प्रवाशांची सुरक्षितता हीच एसटीची खरी ओळख असून चालकांनी जबाबदारीने व संयमाने सेवा बजावून महामंडळाचा गौरव वाढविला आहे,” असे सांगितले. कार्यक्रमास आगारातील अधिकारी, कर्मचारी व चालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सन्मानित चालकांवर अभिनंदनाचा वर्षाव होत असून त्यांच्या कार्याचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.

 
Top