कळंब (प्रतिनिधी)- कळंब आगारातील चालक व वाहकांनी पुन्हा एकदा प्रामाणिकपणाचे दर्शन घडवत प्रवाशांचा हरवलेला मोबाईल व पाकीट परत करून कर्तव्यनिष्ठेचा आदर्श निर्माण केला आहे.
बार्शी-कळंब या नियतावर दि. 12 मे रोजी चालक जे. एल. ओव्हाळ व वाहक एस. एस. गोरे हे कर्तव्य बजावत असताना बसमध्ये अंदाजे 13 हजार रुपये किमतीचा मोबाईल आढळून आला. संबंधित प्रवाशाचा शोध घेत त्यांनी सदर मोबाईल प्रवाशी आम्रपाली धावरे, रा. पुणे यांना कळंब डेपोमध्ये वाहतूक निरीक्षक अनंत कवडे यांच्या समक्ष परत केला.
तसेच पुणे-कळंब गाडीत प्रवासादरम्यान वाहक आर. बी. नवाट व चालक व्ही. जी. अडसुळ यांना प्रवासी दिलीप आत्माराम थोरबोले, रा. पुणे यांचे पाकीट आढळून आले. पाकिटामध्ये रोख रक्कम व महत्त्वाची कागदपत्रे होती. संबंधित प्रवाशाशी संपर्क साधून आगाराच्या प्रवेशद्वारावर सुरक्षा रक्षक व वाहतूक निरीक्षक अनंत कवडे,वाहतूक नियंत्रक सारूक, वाहक पटेकर यांच्या उपस्थितीत पाकीट सुखरूप परत करण्यात आले. कळंब आगारातील चालक-वाहकांच्या या प्रामाणिकपणाबद्दल प्रवाशांकडून समाधान व्यक्त करण्यात येत असून त्यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
