कळंब (प्रतिनिधी)- महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या रा. प. कळंब आगाराच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135 व्या जयंतीनिमित्त कर्मचारी पाल्यांसाठी निबंध, प्रश्नमंजुषा, संगीत खुर्ची व रांगोळी स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
निबंध स्पर्धेत आयुष बाबुराव यादव याने प्रथम क्रमांक पटकावला. संभाजी बाबुराव यादव याने द्वितीय तर अपूर्व आबा क्षिरसागर याने तृतीय क्रमांक मिळविला.
प्रश्नमंजुषा स्पर्धेत आयुष बाबुराव यादव प्रथम, युवांश आदिनाथ झोंबाडे द्वितीय व कनिष्क सुबोध रणदिवे तृतीय क्रमांकाचे मानकरी ठरले.
संगीत खुर्ची स्पर्धेत सरोजा औसेकर, प्रियांका कांबळे व अनुराधा भोसले यांनी यश संपादन केले. तसेच रांगोळी स्पर्धेत प्रियांका कांबळे, वंदना पालखे व वंदना सोनवणे यांनी आकर्षक कलाकृती साकारत पारितोषिक मिळविले. याशिवाय नगर परिषद शाळा क्रमांक 1 व 2 मधील सुमारे 50 विद्यार्थ्यांनी निबंध स्पर्धा व सामान्य ज्ञान स्पर्धेत सहभाग घेत उत्कृष्ट यश संपादन केले. सर्व विजेत्या विद्यार्थ्यांना सन्मानपत्र तसेच रोख स्वरूपात बक्षिसे देऊन गौरविण्यात आले.
बक्षीस वितरण समारंभ दि. 11 मे रोजी कळंब आगारातील दत्त मंदिर येथे सकाळी 11 वाजता उत्साहात पार पडला. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांची प्रेरणा निर्माण झाली असून शैक्षणिक व बौद्धिक स्पर्धांबाबत उत्साह वाढल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली. यावेळी कार्यक्रमात मान्यवरांचे हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले तर या कार्यक्रमासाठी प्रशांत गायकवाड,नितीन गायकवाड,प्रकाश पटेकर, सरोजा औसेकर, प्रियंका कांबळे,तरनुम शेख,पुष्पा शेंडगे,संध्या सोनटक्के सह सर्व जयंती उत्सवाचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.
