धाराशिव (प्रतिनिधी)- विधान परिषदेची स्थानिक प्राधिकारी मतदारसंघ द्विवार्षिक निवडणूक-2026 च्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने निवडणूक प्रचारासाठी लावण्यात येणाऱ्या झेंड्यांच्या काठ्या,कापडी फलक, भित्तीपत्रके आणि घोषणा यावर निर्बंध लागू केले आहेत.संबंधित जागामालक व परवाना प्राधिकरणाची पूर्वपरवानगी घेतल्याशिवाय कोणत्याही खाजगी अथवा सार्वजनिक जागेचा वापर करता येणार नसल्याचे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी किर्ती किरण पुजार यांनी जारी केले आहेत.
भारत निवडणूक आयोगाने विधान परिषदेची स्थानिक प्राधिकारी मतदारसंघ द्विवार्षिक निवडणूक - 2026 (उस्मानाबाद-लातूर-बीड स्थानिक स्वराज्यसंस्था मतदारसंघ) चा कार्यक्रम जाहीर केला असून, कार्यक्रम घोषित झाल्यापासून आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे.निवडणूक प्रक्रिया शांततेत, निर्भय व न्याय्य वातावरणात पार पाडण्यासाठी जिल्ह्यातील नगर परिषद हद्दीत राजकीय पक्ष, निवडणूक लढविणारे उमेदवार,त्यांचे प्रतिनिधी किंवा हितचिंतक यांच्याकडून प्रचारासाठी झेंड्यांच्या काठ्या उभारणे,कापडी फलक लावणे,भित्तीपत्रके चिकटविणे अथवा घोषणा लिहिणे यासाठी कोणत्याही व्यक्तीची जागा,इमारत, आवार किंवा भिंतींचा विनापरवानगी वापर होऊ नये यासाठी निर्बंध घालणे आवश्यक असल्याची खात्री प्रशासनाला झाली आहे.
जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार यांनी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 च्या कलम 163 अन्वये प्राप्त अधिकारांचा वापर करून हे आदेश जारी केले आहेत. आदेशानुसार,संबंधित जागा मालकाची तसेच परवाना देणाऱ्या प्राधिकरणाची पूर्वपरवानगी घेतल्याशिवाय कोणत्याही व्यक्तीगत जागा,इमारत,आवार,भिंत अथवा सार्वजनिक ठिकाणांचा निवडणूक प्रचारासाठी वापर करण्यास मनाई करण्यात आली आहे. सर्व संबंधितांना नोटीस देऊन त्यांचे म्हणणे ऐकून घेणे सद्यस्थितीत शक्य नसल्याने एकतर्फी आदेश काढणे आवश्यक असल्याचेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.हे आदेश 18 मे 2026 रोजी जारी करण्यात आले असून ते आदेश 26 मे 2026 पर्यंत लागू राहणार आहेत.