धाराशिव (प्रतिनिधी) - रखरखत्या उन्हाचा तडाखा आणि अंगातून निघणाऱ्या घामाच्या धारा..... डोळे लालेलाल करणाऱ्या..... अति तीव्र उष्णतेच्या ज्वाला..... थकलेल्या शरीरातील ताकद क्षीण झाल्याने.... उठून काठीच्या सहाऱ्याने उभा राहण्यासाठी शरीर साथ देत नाही... हात व पाय यामध्ये बळ नसल्याने... दुसऱ्याच्या हाताला धरून चाचपडणाऱ्या.... ऐकू येत नसलेल्या अंदाजे 90 वर्षीय वृद्ध व हताश महिलेची पगार बंद होते..... ती सुरू करावी यासाठी....जिल्हाधिकाऱ्यांच्या परिसरातील तहसील कार्यालयात पायऱ्यावर बसत बसत..... संबंधित अधिकाऱ्याकडे जाते..... परंतू दरवाज्यातच.... रखवालदार असलेल्या शिपायाने मॅडम नाहीत..... उद्या या.... असा रुबाबात फतवा सोडत त्यांना आल्या पावली रिकाम्या व नैराश्याने परत पाठवले.....ते देखील दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास आणि उन्हाचा पारा डोक्यावर चढलेला असताना... ही मन हेलवणारी व डोकं सुन्न करणारी आणि काळजाला हुरहुर लावणारी मात्र तितकीच.... थरारक जीवघेणी घटना काल्पनिक नाहीतर.... धाराशिव तहसील कार्यालयातील अजब कारभाराची गजब व डोळ्यात झणझणीत अंजन घालणारी घटना घडली आहे. यापुढे एकाही ग्रामस्थास तालुका किंवा जिल्हाधिकारी कार्यालयात शासकीय कामासाठी हेलपाटे मारण्याची गरज नाही. आवश्यक कागदपत्रे गाव स्तरावर उपलब्ध दिली जातील असे आश्वासन जिल्हाधिकाऱ्यांनी छत्रपती शिवाजी महाराज महाराजास्व अभियानच्या शुभारंभ प्रसंगी दिले. मात्र, आश्वासन वाऱ्यावर विरले असल्याचे स्पष्ट झाले आहे. प्रशासनाचे गावचे प्रमुख असलेले तलाठी अर्थात ग्राम प्रशासकीय अधिकारी व ग्रामसेवक अर्थात ग्रामपंचायत अधिकारी हे मात्र जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांनी दिलेल्या आश्वासनाची अंमलबजावणी करण्यामध्ये सपशेल अपयशी ठरल्याचे वास्तव दि.29 एप्रिल रोजी रखरखत्या उन्हात निदर्शनास आले आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी साहेब, जरा इकडे लक्ष देऊन वृद्धांच्या काठीचा आधार केव्हा बनणार ? असा काळजाला कुर्तडणारी व काळीज चिरणारी आर्त हाक वृद्ध मारीत आहेत.
धाराशिव तालुक्यातील वाघोली येथील विमल दत्तू सुतार (वय - 90 वर्षे) या वृद्ध महिलेस दर महिन्याला दीड हजार रुपयाचे मानधन दिले जाते. हे बंधन सुतार यांच्या धाराशिव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या धाराशिव शाखेत असलेल्या खात्यावर जमा होत होते. मात्र मागील महिन्यापासून ते बंद करण्यात आले आहे. त्यामुळे ते पुन्हा सुरू करावे या एकमेव मागणीसाठी धाराशिव तहसील कार्यालयातील संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना भेटण्यासाठी आल्या. मात्र, दारावर उभे असलेले शिपाई मामांनी या वृद्ध महिलेला संबंधित अधिकारी नाहीत तुम्ही उद्या या असा अजब सल्ला देऊन त्यांना तेथून आल्या पावली परत जाण्यास भाग पाडले. त्यामुळे त्यांच्यासोबत आलेल्या व्यक्तीने त्यांना हाताला धरून जुन्या जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत आणले. तेथे इयत्ता त्यांना वरधाप भरला. त्यामुळे त्या रखरखत्या उन्हात व चटके देणाऱ्या डांबरी रस्त्यावरच त्या मटकन खाली बसल्या. डोक्यावर आग विकणाऱ्या आणि मी म्हणणारे तप्त उन्हाचे चटके देखील खालून वरून शोषित त्या अक्षरशः होरपळून गेल्या. विशेष म्हणजे या परिसरात रिक्षा येऊ शकत नसल्यामुळे त्यांच्यासोबत असलेल्या सहकारी असलेल्या व्यक्तीने कसेबसे जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील रस्त्यावर आणले. रिक्षाला हात दाखवून थांबविले. मात्र रिक्षामध्ये त्यांना बसता देखील येत नव्हते त्यामुळे रिक्षाचालक खाली उतरला आणि त्या दोघांनी त्यांना रिक्षात बसवून ते दोघे आपल्या गावाकडे निघून गेले. मात्र, इतकी बिभस्त अवस्था सध्या राबविण्यात येत असलेले छत्रपती शिवाजी महाराज महा राजस्व अभियान दरम्यान होत असेल तर इतर वेळी सर्वसामान्यांना कोणतीही शासकीय कागदपत्र काढण्यासाठी किती कसरत करावी लागत असेल याचा विचार न केलेलाच बरा.
गावी आपले सेवा केंद्र नावालाच !
नागरिकांना रहिवासी, उत्पन्न, जात, शिधा पत्रिका, आबा कार्ड आदींसह इतर विविध प्रकारची शासकीय कागदपत्र काढण्यासाठी गावोगावी असलेल्या आपले सेवा केंद्र अंतर्गत ती उपलब्ध करून देण्याची सुविधा आहे. मात्र, वरील कागदपत्रे काढण्यासाठी नागरिकांना सर्रासपणे तालुका किंवा जिल्हा स्तरावरच यावे लागत आहे. त्यामुळे गावावरच सर्व कागदपत्रे उपलब्ध करून देणार असल्याचे जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजा यांनी दिलेले आश्वासन हे वास्तवात केव्हा आणि कसे उतरणार ? असा प्रश्न निर्माण झाला आहे.
