धाराशिव (प्रतिनिधी)-  जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या कै.अनंत भालेराव स्मृती पत्रकारिता पुरस्कार वितरण सोहळा रविवारी (दि.12) संपन्न होणार आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते बक्षीस व पुरस्कारांचे वितरण होणार आहे.

धाराशिव शहरातील नगर परिषदनजिकच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात रविवारी स. 11 वा. हा सोहळा संपन्न होणार आहे. या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी राज्याचे परिवहन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री प्रताप सरनाईक तर प्रमुख पाहुणे म्हणून राज्याचे रोहयो, फलोत्पादन मंत्री भरत शेठ गोगावले, सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट, खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर, महाराष्ट्र इन्स्टट्युिशन फॉर ट्रान्सफार्मेशनचे (मित्रा) मुख्य  कार्यकारी अधिकारी प्रविणसिंह परदेशी, माजी मंत्री आमदार डॉ. तानाजीराव सावंत, आमदार राणाजगजितसिंह पाटील, आमदार कैलास घाडगे पाटील, आमदार प्रविण स्वामी, माजी आमदार ज्ञानराज चौगुले यांची उपस्थिती राहणार आहे. 

धाराशिव जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या कै. अनंत भालेराव स्मृती पत्रकारिता पुरस्काराचे वितरणही यावेळी उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते होणार आहे. यामध्ये शोधवार्ता गटातून प्रथम बालाजी पांडुरंग वडजे (उमरगा), अमोल भास्कर मुळे द्वितीय (बीड), राजहंस तुकाराम कांबळे (उदगीर, जि.लातूर) व रोशन मुल्ला तृतीय(उदगीर, जि.बीड) तर विशेष वार्ता गटातून माधव आटकोटे (नांदेड) प्रथम, रमेश अर्जुन कदम (हिंगोली) द्वितीय, दिपक लिंबराज बारकुल (येरमाळा, जि.धाराशिव) व डॉ. रविंद्र भताने (चापोली, जि.लातूर) तृतीय यांना कै. अनंत भालेराव स्मृती पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. 


या बक्षीस, पुरस्कार वितरण सोहळ्यास जिल्ह्यातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन जिल्हा मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष धनंजय रणदिवे, पत्रकार संघाचे सरचिटणीस संतोष जाधव, सहसरचिटणीस राजाभाऊ वैद्य, कोषाध्यक्ष संतोष हंबीरे, उपाध्यक्ष अब्बास सय्यद (भूम) व श्रीकांत कदम (तुळजापूर)  यांनी केले आहे.

 
Top