भूम (प्रतिनिधी)- भूम तालुक्यातील सामनगाव येथे पारधी समाजातील एका कुटुंबावर दुर्दैवी संकट कोसळले असून मीराबाई काळे यांचे घर आगीत पूर्णपणे जळून खाक झाले. या आगीत घरातील कपडे, धान्य, संसारोपयोगी साहित्य तसेच लहान मुलांची शालेय दप्तरदेखील जळून नष्ट झाली.
घटनेची माहिती दूरध्वनीद्वारे मिळताच सामाजिक बांधिलकी जपत शिवसेना महिला आघाडी जिल्हाप्रमुख धाराशिव अर्चनाताई दराडे यांनी व काही महिला कार्यकर्त्या तत्काळ घटनास्थळी दाखल झाल्या. त्यांनी पीडित कुटुंबाला किराणा साहित्य, धान्य, साड्या, मुलांसाठी दप्तर व खाऊ देत तातडीची मदत केली.
दरम्यान, सहा महिन्यांच्या नातीला वाचवताना मीराबाई काळे या गंभीररीत्या भाजल्या असून त्यांच्या दोन्ही हातांना दुखापत झाली आहे. अर्चनाताई दराडे यांनी तातडीने भूम ग्रामीण रुग्णालयामध्ये फोन करून ॲम्बुलन्स बोलवण्यात आली व त्यांना तातडीने भूम ग्रामीण रुग्णालयात दाखल करून उपचार सुरू करण्यात आले.
भूम-परंडा-वाशी मतदारसंघाचे विद्यमान आमदार डॉ. प्रा. तानाजीराव सावंत यांच्या माध्यमातून पत्र्याच्या शेडसाठी आर्थिक मदत मिळवून देत उद्ध्वस्त झालेला संसार पुन्हा उभा करण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार असल्याचे आश्वासन देण्यात आले.
