कळंब (प्रतिनिधी)- राज्य परिवहन महामंडळाने प्रवाशांच्या तिकिटावर आकारलेला दोन रुपयांचा स्वच्छता कर हा सर्वसामान्य प्रवाशांच्या खिशावर टाकलेला अतिरिक्त आर्थिक भार असल्याची तीव्र नाराजी राज्यभरातून व्यक्त होत आहे. राज्यात दररोज सुमारे ५५ लाख प्रवासी एसटीने प्रवास करतात. त्यामुळे प्रत्येक तिकिटामागे दोन रुपये आकारल्यास महामंडळाच्या तिजोरीत दररोज १ कोटी १० लाख रुपये, महिन्याला ३३ कोटी रुपये, तर वर्षाला तब्बल ४०१ कोटी ५० लाख रुपये जमा होणार आहेत.
इतक्या मोठ्या प्रमाणात निधी जमा होत असताना राज्यातील अनेक बसस्थानके आणि बसेस आजही स्वच्छतेच्या मूलभूत सुविधांपासून वंचित असल्याचे वास्तव समोर येत आहे. राज्यात सध्या २५१ आगार आणि ५९८ बसस्थानके असून या सर्व ठिकाणची स्वच्छता, पिण्याच्या पाण्याची सुविधा, स्वच्छतागृहे आणि बसची नियमित साफसफाई यासाठी हा निधी प्रभावीपणे वापरण्याची मागणी जोर धरत आहे.
महामंडळाने अलीकडेच सहलीच्या माध्यमातून १२७ कोटी १८ लाख रुपये उत्पन्न मिळवले असून, त्यासाठी २५ हजार ५५८ बस फेऱ्या करण्यात आल्या. गतवर्षीच्या तुलनेत ३३ कोटी २९ लाख रुपयांची वाढ झालेली असतानाही प्रवाशांना अपेक्षित सुविधा मिळत नसल्याने नाराजी वाढत आहे.
प्रवाशांचे म्हणणे आहे की, अनेक बस वाटेतच बंद पडतात, स्वच्छतेचा अभाव जाणवतो, तर बसस्थानकांवरील परिस्थितीही समाधानकारक नाही. त्यामुळे स्वच्छता करातून मिळणारा निधी नेमका कुठे खर्च होतो, याबाबत पारदर्शकता ठेवावी अशी मागणी पुढे येत आहे.
दरम्यान १५ एप्रिल ते १५ जून हा गर्दीचा उन्हाळी हंगाम सुरू होत असताना महामंडळाने १० टक्के उन्हाळी भाडेवाढ जाहीर करून प्रवाशांना आणखी एक मोठा धक्का दिला आहे. आधीच वाढत्या महागाईने त्रस्त असलेल्या सर्वसामान्यांना आता एसटी प्रवासही महाग होत असल्याची भावना व्यक्त होत आहे.
एकेकाळी “गोरगरिबांची लालपरी” म्हणून ओळखली जाणारी एसटी आता सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर जात असल्याची चर्चा सुरू झाली आहे. इलेक्ट्रॉनिक बस सेवांमध्ये वाढ झाली असली तरी त्याचे तिकीटदर अनेकांसाठी परवडणारे नसल्याने “लालपरी आता श्रीमंतांचीच होत चालली का?” असा सवाल प्रवासी वर्गातून उपस्थित होत आहे.