धाराशिव (प्रतिनिधी)- धाराशिवच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे. जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या 7 शाळांची भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा म्हणून निवड करण्यात आली आहे. जिल्ह्यासाठी ही अत्यंत अभिमानास्पद आणि गौरवास्पद बाब आहे. महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने तसा शासन आदेशही जारी केला आहे. राज्यातील 405 शासकीय शाळांना “भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा“ म्हणून विकसित करण्यास मान्यता मिळाली असून, यात आपल्या धाराशिव जिल्ह्यातील 7 शाळांनी स्थान पटकावले असल्याची माहिती मित्रचे उपाध्यक्ष तथा आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी दिली आहे.
निवड झालेल्या या शाळांमध्ये विकसित महाराष्ट्र - 2047 चे व्हिजन डोळ्यासमोर ठेवून जागतिक दर्जाच्या पायाभूत सोयी-सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. प्रामुख्याने या सर्व शाळांमध्ये आता पहिली ते दहावीपर्यंतचे वर्ग वाढविण्यास मान्यता देण्यात आली आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील मुला-मुलींना एकाच छताखाली सलग आणि गुणवत्तापूर्ण शैक्षणिक सुविधा उपलब्ध होणार आहेत. विद्यार्थिनींच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी स्वतंत्र पिंक रूमची निर्मितीही या शाळांमधून केली जाणार आहे. प्रत्येक शाळेत / शुद्ध पिण्याचे पाणी आणि आधुनिक स्वच्छतागृहांची सुविधाही असणार आहे. जिल्ह्यातून एका शाळेची निवड क्रीडा प्रबोधिनी म्हणून करून तिथे खेळाडूंना विशेष प्रशिक्षण देण्यात येणार आहे.
जिल्ह्यातील या शाळांची झाली निवड
धाराशिव जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे आणि शिक्षकांच्या निष्ठेमुळे जिल्ह्यातील खालील शाळांची या निवड झाली आहे. जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा केशेगाव ता. धाराशिव, जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा पारा, ता. वाशी, जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा होर्टी, ता. तुळजापूर, जिल्हा परिषद माध्यमिक प्रशाला खामसवाडी, ता. कळंब, पीएम श्री जिल्हा परिषद माध्यमिक प्रशाला ईट, ता. भूम, जिल्हा परिषद प्राथमिक कन्या शाळा कसबे तडवळे, ता. धाराशिव, पीएम श्री जिल्हा परिषद माध्यमिक प्रशाला, शिराढोण, ता. कळंब
