धाराशिव (प्रतिनिधी)- गौण खनिज व जमीन महसूल वसुलीमध्ये धाराशिव तालुका जिल्ह्यात अव्वल ठरला आहे. जमीन महसुलमध्ये तर तब्बल 143 टक्के उद्दिष्ट साध्य करण्यात तालुक्याला यश आले आहे. दोन्ही करांची वसुली जिल्ह्यात 74 कोटी 78 लाख रूपये झाली आहे. यामध्ये एकट्या धाराशिव तालुक्याचा वाटा 21 कोटी 33 लाख रूपयांचा आहे.
आर्थिक वर्ष संपत येत असताना महसूल विभागाच्या वतीने गौण खनिज व जमीन महसूल वसूल करण्यावर अधिक भर देण्यात येत असतो. या अनुषंगाने जिल्ह्यात सर्वच तालुक्यातील तहसील कार्यालयांच्या मार्फत जोमाने वसुली करण्यात आली. यामध्ये धाराशिवच्या तहसीलदार मृणाल जाधव यांनी विविध नियोजन करून वसुली मोहीम राबवली. यामुळे त्यांना यश आले आहे. संपूर्ण जिल्ह्यात गौण खनेािची वसुली 53 कोटी 43 लाख 76 हजार झाली आहे. यामध्ये धाराशिव तालुक्याचा वाटा तब्बल 12 कोटी 69 लाख 52 हजार रूपये आहे. तसेच जिल्ह्यात जमीन महसूल 21 कोटी 34 लाख 38 हजार रूपये वसूल झाला आहे. यामध्ये धाराशिव तालुक्याचा वाटा 8 कोटी 43 लाख 85 हजार रूपये आहे. यामध्ये लोहारा, परंडा, भूम, वाशी तालुक्यातील वसुली नगण्य असून, उमरगा, कळंब व तुळजापूर तालुक्याची वसुली 50 ते 60 टक्क्यांच्या जवळपास आहे. जिल्ह्यातील सर्व तालुक्यांचा विचार करता, धाराशिव तालुक्यानेच सर्वाधिक वसुली केली आहे.