धाराशिव (प्रतिनिधी)- जिल्ह्यातील धाराशिव व कळंब तालुक्यातील काही गावांमध्ये इमारत बांधकाम कामगारांच्या नोंदी ग्रामसेवक यांचे बनावट शिक्के तयार करून व सह्या मारून बांधकाम कामगार असल्याच्या नोंदी केलेल्या आहेत. त्या नोंदीच्या आधारे त्यांना शासनाचे लाभ देखील देण्यात आले आहेत. त्यामुळे त्याची चौकशी करून त्या नोंदी रद्द करण्यासह देण्यात येत असलेला लाभ तात्काळ बंद करण्यात यावा, अशी मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (खरात) चे जिल्हाध्यक्ष राजाभाऊ राऊत यांनी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत महाराष्ट्र राज्य कामगार विभागाचे प्रधान सचिव यांच्याकडे एका निवेदनाद्वारे दि.6 एप्रिल रोजी केली आहे.

दिलेल्या निवेदनात असे नमूद करण्यात आले आहे की, धाराशिव व कळंब तालुक्यातील काही गावांमध्ये ग्रामसेवकांचे बनावट शिक्के व सह्या वापरून बांधकाम कामगारांच्या नोंदणी करण्यात आल्या असल्याचा संशय आहे. धाराशिव तालुक्यातील समुद्रवाणी, वलगुड, जुनोनी, झरेगाव, सांगवी, गोपाळवाडी, ढोकी व शिंगोली तसेच कळंब तालुक्यातील पानगाव, मोहा, लोहटा (पूर्व) व उपळाई या गावांमध्ये बनावट प्रमाणपत्रांचा वापर केला जात असल्याची शक्यता आहे. ग्रामसेवकांच्या अधिकृत शीक्के व सह्यांची नक्कल करून तयार करण्यात आलेली कागदपत्रे बांधकाम कामगार नोंदणी प्रक्रियेसाठी वापरली जात असल्याचे प्राथमिक स्वरूपात दिसून येत आहे. त्यामुळे शासनाच्या विविध योजनांचा गैरवापर होण्याची दाट शक्यता आहे. या बनावट प्रकारामुळे आर्थिक अनियमितता व भ्रष्टाचार वाढीस लागण्याचा धोका निर्माण झाला आहे यांची चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे.

 
Top