धाराशिव (प्रतिनिधी)- समाजात जे काही घडते त्याचे चित्र साहित्यामध्ये येते. त्यामुळे अभिव्यक्त होणारे माध्यमे सशक्त होणे आवश्यक आहे असे मत अखिल भारतीय साहित्य परिषदेचे अध्यक्ष डॉ. शरद गोरे यांनी पत्रकार परिषदेमध्ये व्यक्त केले. धाराशिव येथे 29 व 30 मे रोजी अखिल भारतीय साहित्य परिषदेचे साहित्य संमेलन होणार असल्याचेही डॉ. गोरे यांनी सांगितले.
बुधवार दि. 8 एप्रिल रोजी दुपारी घेण्यात आलेंल्या या पत्रकार परिषदेस ज्ञानेश्वर पतंगे उपस्थित होते. धाराशिव येथे होणारे साहित्य संमेलन हे 32 व्या असून, या पूर्वी 18 वर्षापूर्वी धाराशिव शहरात साहित्य संमेलन घेतले होते. अशी आठवण डॉ. गोरे यांनी सांगितली. ग्रामीण भागातील नवीन साहित्यिकांना वाव देण्यासाठी व ग्रामीण साहित्य साहित्यामध्ये येणाऱ्यासाठी आपले प्रयत्न असून, राज्यातील 55 बोली भाषेची जपणूक होणे आवश्यक आहे असेही डॉ. गोरे यांनी सांगितले. काही साहित्य संमेलनामध्ये ठरावी लोकांची मक्तेदारी असते. त्यामुळेच आपल्या या साहित्य संमेलनामध्ये ग्रामीण भागातील साहित्यिकांसह सर्वांना संधी देण्यात येईल असे सांगितले. साहित्य संमेलन नगर परिषदेच्या छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृहात होणार असून, या परिसराला अजित पवार नगरी असे नाव देणार असल्याचे सांगितले.
