तुळजापूर (प्रतिनिधी)- काटगाव (ता. तुळजापूर, जि. धाराशिव) येथील ग्रामपंचायत सदस्य सुर्यकांत वसंत कांबळे यांनी ग्रामपंचायतीच्या आर्थिक व्यवहारांची माहिती मिळत नसल्याने दोन दिवसीय लाक्षणिक उपोषणाचा इशारा दिला आहे. 16 एप्रिल 2026 पासून ग्रामपंचायत कार्यालयासमोर हे उपोषण करण्यात येणार असल्याने गावात खळबळ उडाली आहे.

कांबळे यांनी दिलेल्या निवेदनानुसार, सन 2023 पासून आजतागायत ग्रामपंचायतीला विविध योजनांद्वारे मिळालेल्या निधीचा सविस्तर लेखाजोखा मागवण्यात आला होता. मात्र अनेक वेळा अर्ज करूनही संबंधित अधिकाऱ्यांकडून माहिती देण्यात आलेली नाही.

कांबळे यांनी खालील बाबींची माहिती मागितली आहे :

ग्रामनिधी जमा-खर्च व शिल्लक, जीओ-टॅग फोटो, 15 वा वित्त आयोग निधी, दलित वस्ती सुधार योजना निधी, तांडा सुधार योजना निधी, ग्रामस्वच्छता योजना निधी, अनुसूचित जाती व भटक्या-विमुक्त घटकांसाठी निधी, सन 2023 पासूनचा स्वनिधी जमा व खर्च, विविध विकासकामांचा सविस्तर तपशील मागीतला पण माहिती न दिल्यामुळे ग्रामपंचायतीतील विकास कामांमध्ये मोठ्या प्रमाणावर अनियमितता व भ्रष्टाचार झाल्याची शक्यता कांबळे यांनी व्यक्त केली आहे. त्यांचा आरोप आहे की, ग्रामपंचायत अधिकारी व सरपंच हे सदस्यांना विश्वासात न घेता कामे ठरवत आहेत. तसेच बैठकीचे ठराव (प्रोसिडिंग) वेळेवर नोंदवले जात नसून मागणी करूनही त्याच्या प्रती दिल्या जात नाहीत.

 कांबळे यांनी या संदर्भात राज्य माहिती आयोग, छत्रपती संभाजीनगर येथे अपील केले होते. आयोगाने माहिती देण्याचे आदेश दिले असतानाही अद्याप माहिती देण्यात आलेली नसल्याचा आरोप त्यांनी केला आहे. काटगाव ग्रामपंचायतीला कायमस्वरूपी ग्रामपंचायत अधिकारी नसल्यामुळे प्रशासनात अडचणी येत असल्याचे सांगत, पूर्णवेळ अधिकारी नियुक्त करण्याची मागणीही त्यांनी केली आहे.

माहिती मिळत नसल्यामुळे अखेर कांबळे यांनी 16 एप्रिलपासून दोन दिवसांचे लाक्षणिक उपोषण करण्याचा निर्णय घेतला आहे. “याची सर्व जबाबदारी ग्रामपंचायत प्रशासनावर राहील,” असा इशाराही त्यांनी दिला आहे.  ग्रामपंचायत कारभारावर प्रश्नचिन्ह !यापूर्वीही या ग्रामपंचायतचा कारभार जिल्हा बर गाजलेला असूनही या प्रकरणामुळे काटगाव ग्रामपंचायतीच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून, प्रशासन या प्रकरणात काय भूमिका घेते याकडे ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.

 
Top